दीड वर्षानंतर बाजारपेठेचा नूर बदलला ; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीवर भर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । बाजारावर दीड-दाेन वर्षांपासून काेराेनाचे सावट हाेते. ते आता बरेचसे दूर झाले असून, अर्थचक्र रुळावर येते आहे. धनत्रयोदशीला जळगावच्या सुवर्णबाजारात एकाच दिवसात सोन्याची १५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. तर काल गुरुवारी (ता. ४) लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ग्राहकांनी सुवर्ण खरेदीवर भर दिला. सोबतच घरगुती उपकरणांसह दुचाकी व चारचाकीच्या मार्केटलाही दिवाळी व लक्ष्मी पावल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच बाजारपेठेचा नूर बदलला.

दरम्यान, दिवाळी पर्वात ५०० कारची विक्री झाली. मात्र, वाढलेली मागणी व पुरवठ्यात झालेली घट या कारणाने नाेंदणी केलेल्या अडीच हजार ग्राहकांना कारची प्रतीक्षा आहे. ह्युंडाई, मारुती, नेक्सा, किया, रेनॉ, होंडा, फोर्ड, टोयोटा, महिंद्रा या ब्रॅन्डेड कारसह होंडा ॲक्टीवा, शाइन, हिरोच्या मोटरसायकल, मोपेड, टीव्हीएस, बजाज व अन्य प्रकारच्या दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पाडव्यासाठीही शेकडो वाहनांची नोंदणी झाली असून, चारचाकीच्या काही मॉडेल्ससाठी महिना, दोन महिन्याची वेटिंग सुरू असल्याचे डिलर्सने सांगितले.

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूमवर सायंकाळी सहापर्यंत गर्दी होती. घरगुती उपकरणे, मोबाईल व सोने-चांदीच्या दुकानांवर रात्रीपर्यंत गर्दी होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरही अनेकांनी वस्तू खरेदीचा योग जुळवून आणला. बाजारातही सायंकाळपर्यंत गर्दी होती.

यंदा झाली २० काेटींच्या फटाक्यांची आतषबाजी
गेल्या वर्षी काेराेनाचा कहर आणि पावसाचे सावट या कारणांनी फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम झाला हाेता. यंदा मात्र काेराेनाचे वातावरण निवळल्याचा फायदा घेत लक्ष्मीपूजनाला धार्मिक पूजापाठ झाल्यानंतर सुरू झालेली फटाक्यांची मनमुराद आतषबाजी रात्री उशिरापर्यंत चालली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक फटाक्यांची विक्री झाली. जिल्हाभरात सुमारे २० काेटींवर विक्री झाली.

कापड बाजार :

कापड बाजारात फारशी गर्दी जाणवत नव्हती. मात्र, साेमवारपासून खरेदी वाढली. लक्ष्मीपूजनाला ती आणखी वाढली. कापड बाजार (घाऊक व किरकाेळ) आणि पादत्राणे विक्रीतून यंदाच्या दिवाळीत सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

लक्ष्मीपूजनाला १५० ट्रॅक्टरची विक्री

१५० ट्रॅक्टरची विक्री शेती मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेने यंदा ट्रॅक्टरची मागणी वाढली. लक्ष्मीपूजनाला १५० ट्रॅक्टरची विक्री झाली असल्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज