वाळूच्या डंपरमुळे तुटली विजेची तार, मोठा अनर्थ टळला

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये विद्युत वाहिनीची अर्थिंगची तार अडकून ती तुटून रस्त्यावर पडल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाकी रोड परिसरात घडली. या भरधाव डंपरमुळे अनेक झाडांच्या फांद्यादेखील तुटून पडल्या. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.

जामनेर शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांची मुजोरी वाढली असून गिरणा नदीतून सर्रासपणे वाळू तस्करी केली जात आहे. कोणाच्याही जीवाची पर्वा न करता शहरातून भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाकी रोड परिसरात एका भरधाव डंपरमध्ये विद्युत वाहिनीची अर्थिंगची तार अडकल्याने ती तार तुटून रस्त्यावर पडली. तसेच अनेक झाडाच्या फांद्यादेखील तुटल्या. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

तुटलेल्या तारांमुळे दुचाकी व इतर वाहन चालकांचा अपघात होऊ नये, म्हणून या भागातील दोन रहिवाशांनी रस्त्यात थांबून ये-जा करणाऱ्यांना सावध केले. त्यामुळे जीवितहानी टळल्याचे सांगण्यात नागरिकांकडून आले. दरम्यान, अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज