एकनाथराव खडसे बिनविरोध? नाना पाटलांची याचिका फेटाळली

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा बँकेचे राजकारण चांगलेच तापले असून निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रतिस्पर्धी असलेले मुक्ताईनगर येथील नाना पाटील यांची याचिका अखेर औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नाना पाटील यांची याचिका फेटाळल्याने खडसेंच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या विरोधात नाना पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे कर्जदार असल्याचे सांगून त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द केले होते. नाना पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्याय देण्याची विनंती केली होती मात्र त्याठिकाणी देखील सुनावणी वेळी त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.

विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र अखेर न्यायालयाने देखील त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला आहे. २१ दिवसांच्या माघारी काळात नाना पाटलांच्या कायदेशीर लढाईत अखेर त्यांना अपयश आले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे विरोधक असलेले नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तूर्तास दिलासा मिळाला असून खडसे बिनविरोध होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज