ना.एकनाथ शिंदे यांचा पाचोऱ्यात गुप्त दौरा, कारण गुलदस्त्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज पाचोरा येथे धावता आणि खाजगी दौरा केला. दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी कृष्णापुरी भागात भेट दिली असून ही भेट का होती याचे कारण गुलदस्त्यात आहे. पाचोरा शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार ना.एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषीकडे हात दाखवायला आले होते तर दुसऱ्या चर्चेनुसार त्यांनी एका महाराजसोबत मंदिर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी केली असल्याचे समजते.

जळगाव लाईव्हला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळीच हेलिकॉप्टरने जळगाव गाठले. पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील हे त्यांच्या वाहनाने ना.शिंदे यांना घेण्यासाठी पोहचले. ना.शिंदे यांचा हा खाजगी दौरा होता. पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात त्यांनी निवडक मान्यवरांसह भेट दिली.

eknath shide pachora

पाचोरा शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषी गजेंद्र जोशी यांचे घरी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भेट देत चर्चा केली. एका खाजगी खोलीत फक्त ना.शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. दुसऱ्या एका चर्चेनुसार ना.एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत पाचोरा शहरात एक भव्य मंदिराचा प्रकल्प मंजूर केला आहे. पाचोरा न.पा.कडे निधी वर्ग करण्यात आला असून त्या संदर्भात ते मंगल भटजी नामक महाराजांकडे चर्चा करायला आल्याचे समजते. पाचोरा न.पा. डिसेंबर महिन्यात बरखास्त होणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ही भेट असल्याचे समजते.

दरम्यान, भेटीप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे काही नगरसेवक आणि जळगावचे माजी नगरसेवक अमर जैन देखील उपस्थित असल्याचे समजते. आजच्या घडामोडी आणि दौऱ्यासंदर्भात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आ.किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. शासकीय माहितीनुसार ना.एकनाथ शिंदे आज ठाणे येथील घरीच असल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज