जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । राज्यात गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या भोसरी भूखंड प्रकरणात काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे ईडीच्या ताब्यात आहेत. खडसे कुटुंबामागे ईडीची चौकशी सुरु असतानाच मंगळवारी या व्यवहारात महत्वाची भूमिका असणारे तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच ईडीने अजून इतरांना समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडून मुदत वाढवून मागितली आहे.
ईडीने भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्याविरुद्ध अटकेचे समन्स काढत सोमवारी अटक केली आहे. सोमवारी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रसंगी मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी ते चौकशीत सहकार्य करत असून या प्रकरणातील मुख्य संशयित नसल्याने त्यांना अटक करू नये असा युक्तीवाद केला. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी दिली आहे.
तर याच सुनावणीत ईडीने खडसे कुटुंबाला चौकशी करण्याच्या हेतून समन्स बजावण्यासाठी वाढीव वेळेची मागणी केली आहे. या प्रकरणात अजून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या आठवड्यातच खडसे दाम्पत्याला प्रोसेस इश्यू करण्यात आलेले आहेत. यानंतर आता चौकशीसाठी अजून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
दरम्यान, आज दुपारपासून ईडीने जिल्ह्यात एका बड्या नेत्याला अटक केल्याचे संदेश फिरत आहेत. जळगावात सध्या तरी कुणालाही अटक झाली नसून केवळ समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.