व्याघ्र अधिवास क्षेत्राला लागले विविध समस्यांचे ग्रहण; वेळीच लक्ष देण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे। पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्राला विविध समस्यांनी ग्रासले असून याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, यामागणीचे निवेदन नुकतेच उपवनसरंक्षक विवेक होसिंग व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

वडोदा वनक्षेत्रात आठ-दहा पट्टेदार वाघांचा कायमस्वरुपी अधिवास असुन इतर हिस्रप्राण्यांसह तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र अतिक्रमण, अवैध वनचराई व वृक्षतोडी यासारखे गैरप्रकार या वनक्षेत्रात वाढले आहेत. मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे याचा विपरित परिणाम थेट स्थानिकांना होत आहे. मागील काळात वन अधिकारी डी.आर. पाटील कार्यरत असतांना कोणत्याही प्रकारचे अतिक्रमणे नव्हती तसेच त्यावेळी मेंढपाळांवर कारवाई होत असल्याने अवैध वनचराईला आळा बसला होता. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून या वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत आहेत. परप्रांतीय मेंढपाळांचे वास्तव्य देखील वाढले आहे. जंगलातील कुरण, गवत नष्ट झाले परिणामी वन्यप्राणी शेतीशिवाराची वाट धरत आहेत व त्यामुळे शेतीपिकांचे नुकसानी होत आहे. जंगल व वनहद्दीच्या शेती परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून याकडे वेळीच लक्ष देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभारी अधिकाऱ्याकडे कारभार
मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पाकरीता प्रयत्नशील आहेत मात्र दुसरीकडे या वनक्षेत्राचा कारभार प्रभारी वन अधिकाऱ्याकडे सोपवुन वनविभाग निर्धास्त झाला आहे. वनविभागाच्या वरीष्ठ पातळीवरून होत असलेल्या दुर्लक्षामुळे वनोपराध करणाऱ्यांना फावत असल्याचे परिसरात बोलले जात आहे. दरम्यान, निवेदनादेते जि.प.सदस्य निलेश पाटील, जि.प.सदस्या वैशाली तायडे, मोहीनी गायकवाड, सोनाली पवार, वन समिती अध्यक्ष शिवा पाटील, दशरथ काकडे, संदिप जावळे, कमलसिंग राठोड, इकबाल तडवी, सुभाष धाडे, गजानन खिरडकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज