fbpx

भूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा : डॉ.सतिष पाटील

'आयएमए'तर्फे तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । कोरोना होऊन गेल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येतात परंतु आपण या आजारातून बाहेर पडलो असून पुन्हा आजार होणार नाही अशी सकारात्मकता बाळगा. भूतकाळ विसरून स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती अधिक बलवान करा असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.सतिष पाटील यांनी दिला.

जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासियांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते कोरोना पश्चात स्वास्थ आणि मनशांती या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी आणि सचिव डॉ.राधेश्याम चौधरी हे देखील सहभागी झाले होते.

आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, जळगाव आयएमएतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचा जळगावकरांना चांगला लाभ होत आहे. नागरिकांचे मनोबल उंचविण्याचा आणि कोरोनाची भिती घालवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएमएचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी म्हणाले की, कोरोना रुग्णांना औषधोपचाराचा बरोबर रुग्णांना समुपदेशनाची, मानसिक धीर देण्याची आवश्यकता असते. रुग्णांना सहानुभूती दर्शवली पाहिजे. कोरोना दरम्यान आणि कोरोना पश्चातही आपण स्वतःचे स्वास्थ चांगले राखणे, सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले.

मुख्य वक्ते डॉ.सतिष पाटील यांनी दुसरे पुष्प गुंफतांना सांगितले की, कोरोना पश्चात अनेक व्यक्तींच्या स्वभावात, वागण्यात आणि बोलण्यात बदल होतो. अनेक रुग्ण कोरोनावर मात करतात परंतु त्यानंतर त्यांची मानसिक हिंमत खचते. रुग्णांनी स्वतःची अंतर्मनाची शक्ती वाढवली पाहिजे. स्वतःच्याच मनाशी सकारात्मक गोष्टी बोलल्या पाहिजे. हवेतल्या गोष्टींपेक्षा, अवास्तव भीतीपेक्षा वास्तवाशी संपर्क ठेवला पाहिजे. सकाळी लवकर उठण्यासाठी प्रयत्न करा. रात्री झोपेची गोळी घेणे टाळा, पाणी, झोप, विश्रांती पुरेसे घ्या. नियमीत व्यायाम करा, असे त्यांनी सांगितले.

लहान-लहान छंद जोपासा, मन वळवा

कोरोना आजार होऊन गेल्यानंतर त्याचे रिपोर्ट, औषधी यांचे विचारमंथन, चर्चा करत बसू नये. नातेवाईकांनी देखील रुग्णांना धीर द्या. मनातील संतापाला वाट देण्यासाठी अंक १०० पासून उलट मोजा, दोन्ही हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकवून ओढा, नादुरुस्त मोबाईल, बंद रिमोट सोबत ठेवा, त्याची बटणे दाबा, जुन्या पोस्टरवर शाई शिंपडून स्वतःचा संताप काढा. डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचारसह मानसिक आधार द्या त्यांचे समुपदेशन करा, असे आवाहन डॉ.सतिष पाटील यांनी केले.

कोरोना विषयी असलेल्या विशेष व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प उद्या दि.११ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ.प्रदीप जोशी हे गुंफणार आहेत. नागरिकांनी त्याचा ऑनलाईन लाभ घेण्याचे आवाहन आयएमएतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज