कुत्रा चोरीचा वाद ६ महिन्यांनी पोहचला पोलीस ठाण्यात, पोलिसांसमोर पेच..

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । पोलिसात कोण आणि कसली तक्रार द्यायला जाईल याचा काही नेमच नसतो. जळगाव शहर पोलीस ठाण्यात असेच एक प्रकरण आले असून पोलिसांसमोर देखील नेमके करावे काय? असा पेच निर्माण झाला आहे. शहरातील भोईटे नगरात शेजारी शेजारी राहणारे दोन कुटुंबीय गेल्या ३ दिवसांपासून पामोरिअन विदेशी प्रजातीच्या कुत्र्यावरून भांडत आहेत. कुत्रा चोरी झाला आणि ६ महिन्यांनी शेजाऱ्यांच्या घरात दिसून आल्यावरून हा प्रकार सुरु झाला. कुत्रा नेमका ओळखणार कसा? हा प्रश्नच सुटत नसल्याने पोलिसांनी अखेर दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला आहे.

जळगाव शहरातील भोईटे नगरात राहणाऱ्या एका कुटुंबीयांचा पामोरिअन या विदेशी प्रजातीचा कुत्रा गेल्या ६ महिन्यांपूर्वी कुणीतरी चोरून नेला होता. आता तसाच कुत्रा शेजाऱ्यांच्या घरात दिसून आल्याने त्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या लबाड प्रवृत्तीच्या महिलेला आमचा कुत्रा फार आवडत होता. तिने वारंवार कुत्र्याची आमच्याकडे मागणी केली परंतु आम्ही कुत्रा न दिल्याने त्या महिलेने घराच्या कंपाऊंडमध्ये कुत्रा बांधलेला असताना त्याचा पट्टा कापून तो चोरी केला. इतकंच नव्हे तर कुत्रा ताबडतोब आपल्या बहिणीकडे गुजरात येथे पाठवून देखील दिला असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

मोबाईलला दाखविले २०१९ पासूनचे फोटो

शहर पोलिसांनी अर्जाच्या चौकशीसाठी दोन्ही शेजाऱ्यांना बोलावून घेतले. दोन्ही कुटुंबीय सुशिक्षित असल्याने सर्व सामोपचाराने मिटेल असे पोलिसांना वाटत होते मात्र वाद जास्तच चिघळला आणि तब्बल ३ ते ४ दिवस सुरु राहिला. तक्रारदार महिलेने शेजारी असलेल्या महिलेकडील कुत्रा आपलाच असल्याचा दावा केला तर तो कुत्रा त्यांचा नसून आपलाच आहे हे सिद्ध करण्यासाठी शेजारी महिलेने कुत्र्याचे २०१९ पासूनचे फोटो दाखविले. कुत्रा इमानदार असतो आणि आपल्या मालकाला ओळखतो असे म्हणतात पण तो कुत्रा तर तक्रारदार महिलेच्याच अंगावर धावुनि गेला. कुत्र्याला ६ महिने घरात डांबून ठेवल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

कुत्र्याला रंग दिल्याचा आरोप

तक्रारदार यांच्याकडे असलेल्या कुत्र्याचा संपूर्ण रंग हा पंधरा होता तर शेजाऱ्यांकडे असलेल्या कुत्र्याच्या अंगावर फिकट पिवळसर सोनेरी रंगाची छटा आहे. शेजाऱ्यांनी कुत्र्याला रंग दिला असून तो कुत्रा आमचाच असल्याचा दावा तक्रारदार करीत आहे. मुळात शेजाऱ्यांना तो कुत्रा शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेल मालकाच्या पत्नीने भेट दिला असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना देखील चौकशीसाठी बोलाविले.

न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला

पोलिसांनी तीन दिवस प्रयत्न करून देखील दोन्ही पक्ष ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. तक्रारदार सर्व फोटो आणि साक्षीदारांचे म्हणणे ऐकून देखील अद्याप कुत्रा आपलाच असल्याचा दावा करीत असल्याने पोलीस देखील हतबल झाले. अखेर याप्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देत अर्ज निकाली काढला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज