एकनाथराव खडसेंना भाजप सोडण्याचा पश्चाताप होत असेल का?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । कधीतरी राज्यात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) सध्या राष्ट्रवादी आल्यानंतर देखील एका बाजूलाच पडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत डावलले किंवा पराभव पदरी पडल्यावर देखील ते जिव्हारी न लागू देता भाजपात पक्षनिष्ठा दाखविलेल्या पंकजा मुंडे, विनोद तावडे, बावनकुळे यांचा पक्षाने सन्मान करून त्यांचे पुनर्वसन केले. आज तिन्ही नेते एका चांगल्या पदावर आहेत. पक्षाबद्दल त्यांची खदगद असेलही पण ती त्यांनी बोलून दाखवली नाही. भाजपवर आणि नेत्यांवर टीका करून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा पण वर्षपूर्ती होऊन देखील त्यांचे योग्य ते पुनर्वसन झाल्याचे चित्र दिसत नाही. उलटपक्षी राष्ट्रवादीतील काही नेते आणि पदाधिकारी खडसेंच्या वागण्यावर नाराज असल्याचे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहावयास मिळाले. राष्ट्रवादीत येऊनही आपले बस्तान बसत नसल्याने एकनाथराव खडसेंना पश्चाताप तर होत नसेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना अनेक नेत्यांचा पत्ता कापण्यात आला किंवा त्यांना डावलण्यात आलं. त्यात भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठनेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता. अनेक महिने हे नेते अडगळीत पडले होते. दरम्यानच्या काळात एकनाथराव खडसेंनी फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद वारंवार बोलून दाखवली होती. तसेच पक्षातील नेत्यांवर निशाणाही साधला. मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. तर २०१९ मध्ये विधानसभेसाठी तिकीट न दिल्याने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना डावलल्याची भावना असली तरी दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे याबाबत वाच्यता केली नाही. याउलट पक्ष आदेशानुसार आम्ही काम करू अशी संयमित भूमिका त्यांनी घेतली. त्याचे फळ तावडे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वीच पक्षाने विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली, पंकजा यांचंही केंद्रीय कार्यकारिणीत पुनर्वसन करण्यात आलं. त्यानंतर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांना निवडून देखील आणलं. मात्र खडसेंच्या बाबतीत वेगळंच घडतांना दिसत आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार स्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान देणारे खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. यामुळे खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महसूलसह १२ महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. मात्र, अवघ्या दीड वर्षातच त्यांना स्वीय सहाय्यकाचे ३० लाखांचे लाच प्रकरण, दाऊदच्या पत्नीशी संभाषण, जावयाची लिमोझीन गाडी आणि भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण… अशा आरोपांच्या मालिकेनंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खडसेंचे पुनर्वसन झालेच नाही. शिवाय, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी यांना तिकीट देण्यात आले. त्यांचा पराभव झाला, त्यामागेही पक्षातील काही लोक असल्याची तक्रार खडसेंनी भाजपच्या वरिष्ठांकडे केली होती. भाजपात राजकीय भविष्य नाही म्हणून खडसेंनी नोव्हेंबर २०२० मध्ये भाजपाला रामराम केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पक्ष प्रवेश करताच त्यांना मंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र मंत्रीपद तर दूरच मात्र त्यांना साधी आमदारकी देखील मिळालेली नाही. यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा खडसेंचा निर्णय चुकला तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

हे देखील वाचा : गुलाबराव देवकरांचे पुनर्वसन बदलविणार राजकीय समीकरणे

मुलीचे पदही गेले

खडसेंची कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse Khevalkar) यांच्याकडे जिल्हा बँकेची धुरा होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर बँकेवर देखील खडसेंचे वर्चस्व राहिलेले नाही. मुळात संचालक पदाची निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्ष कोण होईल? याचे सर्व सुत्र खडसेंकडे सोपविण्यात आल्याचे राष्ट्रावादीचे म्हणणे होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. अध्यक्षपदासाठी खडसेंनी पुन्हा स्वत:च्यात कन्येच्या नावाचा आग्रह धरल्याने अनेक संचालक नाराज होते. हा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. देवकरांच्या नावासाठी माजी पालकमंत्री अ‍ॅड.सतीष पाटील यांनीही आग्रह धरला होता. याकाळात घडलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी पक्षातील एक मोठा गट खडसेंवर नाराज आहे. यामुळे भविष्यातही खडसेंच्या शब्दाला राष्ट्रवादीत किती वजन असेल? हे आताच सांगणे कठीण आहे.

मुंडे यांना जमले पण खडसेंना नाही

भारतीय जनता पक्षाचाच विचार केला तर अंतर्गत विरोध आणि राजकारणाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही सामोरे जावे लागले. यातून मुंडे अनेकदा खचले पण पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय त्यांनी घेतला नाही. कदाचित त्यांच्या मनात विचार आलाही असेल, मात्र ते पक्षांतर्गत लढत राहिले आणि त्यांनी त्यात यशही मिळवले. पक्षात राहून पक्षांतर्गत विरोध थोपवण्यात मुंडे यशस्वी झाले. मात्र त्यांचेच शिष्य असणार्‍या खडसेंना हे का जमलं नाही? असा प्रश्न भाजपातील अनेकांना पडला आहे. भाजप सोडण्याच्या निर्णयाचा खडसेंना पश्चाताप होत असेल का? या प्रश्नाचे उत्तर खुद्द खडसेंच देवू शकतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -