दिवाळी इफेक्ट : सर्व रेल्वेचे आरक्षण फुल्ल

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहे. नोकरी, शिक्षण, उद्योग धंद्यासाठी बाहेर गावी असलेले नागरिक दिवाळी सणासाठी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सर्वात जास्त रेल्वेचा आधार घेतात. दरम्यान, ऐनवेळी अडचण नको म्हणून अनेकांनी आधीच आरक्षण करून ठेवले आहे. परिणामी आता भुसावळमधून १० गाड्यांना नो-रूम असून कन्फर्म आरक्षित तिकिट मिळणे बंद झाले आहे. इतरही गाड्यांची प्रतीक्षा यादी १०० ते २६१ पर्यंत पोहोचल्याने ऐनवेळी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्यांना आता केवळ तत्काळ तिकिटांचा पर्याय शिल्लक अाहे.

सणासुदीच्या दिवसांतील होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनेक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अजूनही रेल्वेकडून नियमित सेवा बंद असली तरी नागरिकांना रेल्वेचा विशेष सेवांचा आधार वाटत असल्याने या विशेष गाड्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दिवाळीत घरी जाण्यासाठी ऐनवेळी अडचण नको म्हणून अनेकांनी आधीच आरक्षण करून ठेवले आहे. त्यामुळे भुसावळमधून जाणाऱ्या पुणे-नागपूर, दानापूर, आझादहिंद, गितांजली, पवन एक्स्प्रेस, हमसफर, ताप्तीगंगा एक्स्प्रेस या १० गाड्यांना नो-रूम असून कन्फर्म आरक्षित तिकिट मिळणे बंद झाले आहे.

दिवाळी, छटपूजेसाठी मुंबईत कामधंदा, व्यवसायानिमित्त आलेले हजारो प्रवासी उत्तरेकडील त्यांच्या राज्यात परत जातात. याशिवाय अनेक जण पर्यटन, व्यवसायानिमित्त प्रवास करतात. यामुळे रेल्वे गाड्यांना खच्चून गर्दी होते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही गर्दी रोडावली होती. मात्र, यंदा कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने दिवाळी पूर्वीप्रमाणेच धामधुमीत साजरी होईल, असे वातावरण आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रवाशांची संख्या आतापासूनच वाढली आहे. काही चाकरमान्यांनी आधीपासूनच आरक्षण करून ठेवल्याने सध्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० प्रवासी गाड्यांना नो-रूम स्थिती आहे.

याशिवाय इतर गाड्यांची प्रतीक्षा यादी १०० ते २६१ पर्यंत पोहोचली आहे. प्रतीक्षा यादीतील या प्रवाशांना तूर्त वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. अन्यथा तत्काळ तिकीट काढावे लागेल. त्यासाठी अनेक प्रवासी जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीवर चौकशी करताना दिसतात. या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना या गाड्यांतून प्रवास करता येत नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज