fbpx

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र व आयुष्यमान योजनेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन या होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार आदि उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात बाल स्वास्थ केंद्रासाठी 33.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात. कोरोना काळात या इमारतीचे उद्घाटन करता आले नाही. परंतु या कोरोना काळात या इमारतीचा रुग्णांसाठी चांगला उपयोग झाला. आता बालकांना चांगले उपचार मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्राचा जिल्ह्यातील सामान्य कुटूंबांना फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले. तर या केंद्रातून नागरीकांना चांगल्या सुविधा मिळतील असा आशावाद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या केंद्राची उभारणी, येथे मिळणार असलेले उपचार व सुविधा आदिबाबत माहिती दिली.

या केंद्राचा जळगाव शहराबरोबरच जिल्ह्यातील बालकांना फायदा होणार असून त्यांना उपचारासाठी इतर जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितले. या कार्यक्रमास डॉ. संगीता गावीत, डॉ माधवी नेहेते यांच्यासह जिल्हा सामान्य रुगणालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज