जिल्हा बँक निवडणूक : ९ उमेदवारांच्या अपिलावर झाली सुनावणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद झालेल्यांपैकी ९ उमेदवारांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले आहे. दरम्यान, या सर्व ९ उमेदवारांच्या अपिलावर मंगळवार दि.२६ रोजी विभागीय सहनिबंधक लाटकर यांच्या दालनात सुनावणी पूर्ण झाली असून विभागीय सहनिबंधक काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणुक ऐन रंगात आली असतांना जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, माजी आमदार संतोष चौधरी यांसह काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. दरम्यान, अर्ज बाद झालेल्या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे धाव घेत अपील दाखल केले होते. त्यानुसार जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, भारती चौधरी, नाना पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ९ उमेदवारांच्या अपिलावर मंगळवार दि.२६ रोजी विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांच्या दालनात सुनावणी झाली. सुनावणीनंतर विभागीय सहनिबंधक काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी आ. संतोष चौधरी यांच्या वकिलाने मांडली बाजू
भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांच्यासह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संदर्भात माजी आ. संतोष चौधरी यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलावर मंगळवार दि.२६ रोजी विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांच्याकडे सुनावणी झाली. यावेळी चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.विक्रम पवार यांनी बाजू मांडली.

न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास
आपल्याविरोधात कट कारस्थान रचण्यात आले असून न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संतोष चौधरी यांनी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज