महिलांचे कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले, घरातील जमापुंजी त्यात खर्च झाली. आजारपणामुळे कर्ज वाढले असून घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यात बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात असून कुटुंबीयांसमोर अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हप्ते परतफेड करणे शक्य नसल्याने महिलांचे बचत गट, मायक्रो फायनान्सचे कर्ज केंद्र सरकारने माफ करावे, कर्ज माफी करता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे लोकांना अजूनही हाताला काम नाही. लॉकडाऊन काळात घरातील जमा पुंजी घरातील दैनंदिन गरजेसाठी खर्च झाली. शालेय शिक्षण ऑनलाईन केले. दोन मुले असणाऱ्या परिवाराची तर तारेवरची कसरत झाली. बऱ्याच परिवारात रोजच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. तिथे मोबाईल कुठून घ्यायचा. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांच्यामागे घरभाड्यासाठी घरमालकाचा तगादा असतो, आर्थिक आवक बंद असल्याने घर भाडे भरायचे असे? लॉकडाऊन काळात बऱ्याच लोकांना दवाखान्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे बऱ्याच लोकांनी व्याजाने पैसे घेतले.

लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने पैसे देणाऱ्यांनी वसुलीसाठी अरेरावी, शिवीगाळ, धमक्या असे मार्ग अवलंविले. बचत गटातील वसुली करणारे प्रतिनिधी कर्जदारांच्या घरी येऊन तगादा लावतात, तीन-तीन तास बसून राहतात. त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असून घरातील सदस्यांसमोर हा प्रकार घडत असल्याने कुटुंबीय मानसिक ताणसारख्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे कुटुंबासह आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संघटनांचा पाठिंबा
महाराष्ट्रातील महिलांचे बचत गटाचे कर्ज केंद्र सरकारने माफ करून त्यांना या ओझ्यातून मुक्त करावे, जर कर्ज माफ करू शकत नसाल तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीसाठी गायत्री सोनवणे, चारुलता सोनवणे, फिरोजा शेख, आशा बडगे, आयशा मणियार, मीरा सोनवणे, सागर कोळी, फिरोज पिंजारी यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे पुकारण्यात आले आहे. आंदोलनाला संयम बहुउद्देशीय संस्था, जननायक फाउंडेशन, छावा मराठा युवा महासंघ, धर्मरथ फाउंडेशन आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज