शहरातील कामे पंधरा दिवसात मार्गी लावा; समाजवादी पार्टीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील रस्त्यांना मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. गटारी पूर्ण झालेल्या नाहीत. तीन वर्ष उलटूनही शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झालेले नाही. त्यामुळे शहरातील कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीतर्फे महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मूलभूत सुविधांबाबत समाजवादी पार्टीतर्फे सोमवार दि. १८ रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, जळगाव शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण शहरातील रस्त्यांना खड्डे पडेल आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गटारी सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. शिवाजी नगर उड्डाणपूल अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येणार होता, परंतु तीन वर्ष उलटूनही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. सर्वच कामे अपूर्ण असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात काम पूर्ण झाले नाही तर समाजवादी पाटीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर, युवा महानगराध्यक्ष झिसान अशरफी, उपाध्यक्ष हसन शेख, शेख आसिफ, सचिव आवेश खाटीक, जिल्हाध्यक्ष शेख मोहेनिद्दीन, युवा जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, महिला जिल्हाध्यक्ष साजीला इकबाल, प्रशांत झेंडे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज