यावल ते चोपडा व विरावली ते दहीगाव रस्ता दुरुस्तीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । यावल ते चोपडा व विरावली ते दहीगाव या रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे किंवा नव्याने बनविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

यावल ते चोपडा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची डागडुजी झाली असली तरी ती पाहिजे तशी झालेली नाही. त्यामुळे हा रस्ता नव्याने करण्यात यावा तसेच विरावली ते दहिगाव रस्त्याची देखील दयनीय अवस्था झालेली आहे. वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे, विरावली ते दहीगाव रस्ता दुरुस्ती किंवा नव्याने तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवकांत पाटील, युवक शहर अध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुका संघटक राहुल चौधरी, तालुका सरचिटणीस रोहन महाजन, संघटक अक्षय बोरोले, विरावली शाखा अध्यक्ष गिरीष पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, उपाध्यक्ष पवन पाटील, बादशा पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज