निंबादेवी धरणाच्या सांडव्याचे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील निंबादेवी धरण यंदा पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू असून सांडव्यातून हे पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरण या पावसाळ्यात पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी सांडव्यातून वाया जात आहे.हे वाया जाणारे पाणी नदी जोड प्रकल्प अंतर्गत नागादेवी पाझर तलावात सोडल्यास त्या परिसरातील दहीगाव, सावखेडा, चुंचाळे, बोराळे, विरावली, कोरपावली, मोहराळा, महेलखेडी, नागादेवी, नायगाव आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठीची व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पाणी प्रश्न सुटेल
वाया जात असलेले पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत नागादेवी पाझर तलावात सोडल्यास सातपुडा पायथ्याशी असलेल्या सर्व परिसराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल, अशा आशयाचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, विधानसभा प्रमुख अनिल साठे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज