संविधान जनजागृतीसाठी जळगावच्या तरुणाची सायकलवर दिल्ली वारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील यांनी जळगाव ते दिल्ली असा तब्बल १७०० कि.मी.चा प्रवास सायकलीने पूर्ण केला. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर ते त्या ठिकाणी काही दिवस संविधानाचा प्रचार, प्रसार करणार असून २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनी राष्ट्रपतींना निवेदन देणार आहेत.

‘संविधान साक्षरता अभियाना’अंतर्गत जळगाव शहरातील कार्यकर्ते मुकेश राजेश कुरील हे सायकलीने जळगाव ते दिल्ली असा प्रवास केला. ५ नोव्हेंबरला जळगाव येथुन या प्रवासाला सुरूवात झाली होती. प्रवासादरम्यान ते सर्वांना ‘संविधान वाचवा आणि आत्मसात करा’ असा संदेश देत आहेत. जळगाव, बऱ्हाणपूर, आष्टा, भोपाल, विदीशा, सागर, हिरापुर, छत्तरपुर, महोबा, कानपुर, लखनौ, शहाजहाँपुर, मुरादाबाद, हापुर असा प्रवास करत सोमवार दि.२२ रोजी त्यांनी दिल्ली गाठली. मुकेश कुरील यांनी जळगाव ते दिल्ली असा १७०० किमीचा प्रवास १८ दिवसात पूर्ण केला. २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पोहोचण्याचा त्यांचा संकल्प होता, परंतु त्यांनी स्वत:शीच शर्यंत करत एका दिवस आगोदरच म्हणजेच दि.२२ रोजीच दिल्ली गाठली.

दिल्लीत चार दिवस करणार प्रचार
मुकेश कुरील यांनी संविधानाचा जागर, प्रचार-प्रसार करत दिल्ली गाठली. दिल्ली येथे त्यांनी अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणस्थळी जाऊन अभिवादन केले. कुरील हे सलग चार दिवस राजधानी दिल्ली येथे संविधानाचा प्रचार प्रसार करणार आहेत. दरम्यान, यांनी राष्ट्रपती भवन कार्यालयात राष्ट्रपतींना भेटण्यासाठी ई-मेलद्वारे विनंती केलेली आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस असल्याने त्या दिवशी ते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज