fbpx

सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनानंतर मारहाणीत महावितरणच्या तंत्रज्ञचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२१ । पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी आज तालुक्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोका आंदोलन पुकारले होते. आंदोलनानंतर भडगाव येथे दुपारी महावितरणच्या कार्यालयात प्रवेश करीत सात तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी एका वरिष्ठ तंत्रज्ञला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाच्या थकबाकी पोटी सक्ती करण्यात येत असून ऐन पेरणीच्या हंगामात ही वसुली थांबवावी यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यात महावितरण कार्यालयांना ताला ठोको आंदोलन पुकारले होते. संपूर्ण तालुक्यात आंदोलन शांततेत पार पडले. भडगाव येथे देखील आंदोलनकर्त्यांनी सकाळी ११ वाजता आंदोलन केले. आंदोलन संपल्यानंतर दुपारी १२.४५ च्या सुमारास तीन तरुण महावितरणच्या कार्यालयात घुसले व धामोरे साहेब कोण आहे असे विचारत त्यांनी नासधूस करीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे स्वतःचा जीव वाचवत कार्यालया बाहेर पडले असता त्यांच्यासोबत कार्यालयातील कर्मचारी आणि वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे हे देखील बाहेर आले. सर्व वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्या सात जणांनी गजानन राणे यांना देखील मारहाण केली. मारहाणीत राणे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्याने ते सर्व तिथून निघून गेले. महावितरण कर्मचाऱ्यांनी राणे यांना तत्काळ वाहनाने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मृत्यूस कारणीभूत ठरले, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जमावबंदीचे उल्लंघन असे कलमांतर्गत भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आमदार किशोर पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटल्याने संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केली असून त्यांनी केलेल्या मारहाणीत महावितरणच्या तंत्रज्ञान चा मृत्यू झाला आहे. आंदोलनाशी संबंधित सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी महावितरण अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज