हाणामारीतील जखमी तरुणाचा मृत्यू ; संशयिताला सुनावली कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या चोपडा तालुक्यातील देवगाव येथील रवींद्र पाटील या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. दरम्यान,  याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

१४ रोजी देवगाव येथे संशयित चंद्रशेखर नामदेव सपकाळे गुरांसाठी असलेल्या हौदावर बसलेला होता. यावेळी रवींद्र पाटील याने दारूच्या नशेत त्याला अपशब्द वापरला. त्यामुळे संशयित सपकाळे याने रवींद्र पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले, तसेच बैलगाडीचे लाकडी शिंगाडे काढून पोटावर, पाठीवर मारहाण केली. त्यामुळे शिवदास पाटील, रवींद्र मोरे, भगवान पाटील धाव घेत भांडण सोडवले. त्यानंतर संशयित सपकाळे घटनास्थळावरून निघून गेला.

१५ रोजी सकाळी जखमी रवींद्र पाटील यांना त्रास व्हायला लागला. वडील व पत्नी यांनी त्यांना धानोरा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठवले. १६ रोजी त्यांना पुन्हा त्रास होत असल्याने, डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रवींद्र पाटील यांना कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या पत्नी भावना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. चंद्रशेखर सपकाळे याला पोलिसांनी अटक केली.

पोटातील आतडी तुटली
जिल्हा रुग्णालयात रवींद्र पाटील यांनी तपासले असता, पोटातील आतडी तुटलेली असल्याचे आढळले. त्यानुसार १७ रोजी त्यांचे पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र, १८ रोजी सायंकाळी प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला. १९ रोजी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज