जळगाव जिल्ह्यात केळी बागांवर आढळला कुकुंबर मोझॅक व्हायरस ; असे करा उपाय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ ।  जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील केळी बागांवर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली आहे. कृषी तज्ज्ञांना पाहणी करताना हि बाब समाजली आहे. रावेर तालुक्यातील रसलपूर, चिनावल, ऐनपूर, रोझोदा, कळमोदा, तर यावल तालुक्यातील न्हावी, बोरखेडा शिवारात या रोगाची प्राथमिक अवस्थेमधील लक्षणे आढळून आली आहे. कोचूर, पुनखेडा, रसलपूर, मुंजलवाडी, कुसुंबा येथे केळीवरील इर्व्हिनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी दिली आहे.

रोगनियंत्रणासाठी असे करा उपाय

सीएमव्ही – मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) २ मिली किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून केळी बागेवर फवारणी करावी.

इर्व्हिनिया रॉट – नवीन लागवड केलेल्या केळी बागेच्या क्षेत्रात १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड, ३०० मिली क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन यांचे द्रावण तयार करून प्रत्येक झाडास २०० मिली टाकावे. लागवडीच्या वेळी जमिनीतून ६ ग्रॅम ब्लिचिंग पावडरची भुकटी प्रती झाड द्यावे.त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने चार वेळा हीच प्रक्रिया करावी.

लागवडीनंतर १ महिन्याने ५०० पीपीएम स्ट्रेप्टोसायक्लिन द्रावणाची एक ते दोन लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात ट्रायकोडर्मा व्हीरिडी हे जैविक बुरशी नाशक ५० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून द्यावे.

काय काळजी घ्यावी :

रोपनिर्मितीसाठी शेतकऱ्यांकडे स्वतंत्र मातृबाग असावी. परप्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणू नयेत. यासाठी संसर्गरोग उपायांची कडक अंमलबजावणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावी. बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारचे तण काढून स्वच्छता ठेवावी. बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये. बागेभोवतीचे रानकारली, शेंदणी, करटुले, गुळवेल या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. यामुळे केळीचे रोगराईपासून संरक्षण करता येते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -