fbpx

पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात ; दुबार पेरणीचे संकट?

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ ।  एरंडोल तालुक्यात जवळपास आठवड्या भरापासून पावसाने दडी मारल्यामुळे इवल्या, इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. पावसाअभावी पिके कोमजत आहेत. एकंदरीत पाऊस रुसून बसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होईल. असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मृगनक्षत्र हे मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात ज्वारी, मका, उडीद, मुग, कोरडवाहू कपाशी, यांचा समावेश आहे. खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे.

एरंडोल ,कासोदा ,तळई, उत्राण, रिंगणगाव, खर्ची, रवंजे, या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे.  उधार, उसनवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

विशेष हे की रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. आज पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज मात्र पाऊस हुलकावणी देतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज