कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । कोविड-19 विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर ‘ब्रेक द चेन’ अतंर्गत जळगाव जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांकरीता स्थापन करण्यात आलेल्या समुपदेशन व सुविधा केंद्रामार्फत सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालय, जळगाव यांनी आजपावेतो हजारो परप्रांतीय कामगारांना स्थलांतरीत न होण्याबाबत समुपदेशन केले असून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करुन दिल्याची माहिती  चं. ना. बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत नविन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार कामगार आयुक्तांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालय तसेच जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध आस्थापना/ कारखान्यात विशेषत: बांधकाम क्षेत्र, चटई उद्योग व दाळ मिलमध्ये 50 हजाराच्या आसपास कामगार काम करीत आहेत. यामध्ये 15 हजारापेक्षा अधिक परप्रांतीय कामगार आहेत. याठिकाणी काम करीत असलेले स्थलांतरीत/परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मुळगावी (मुळ राज्यात) जात असल्यास तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मुळगावी परत आलेले/येत असल्यास या कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन केले असून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधता येईल. तसेच स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी/प्रश्न असल्यास कामगार कार्यालयातील श्री. जितेंद्र पवार, केंद्र प्रमुख यांच्याशी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257- 2239716 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच लॉकडाऊन-1 च्या काळातही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 5400 परप्रांतीय कामगारांना श्रमिक रेल्वेमार्फत त्यांच्या मूळ राज्यात रवाना करण्यासाठी कामगार कार्यालयाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. शिवाय या मदत कक्षामार्फत अनेक परप्रांतीय कामगारांना थकीत वेतन मिळून देणे, स्वयंसेवी संघटनाशी संपर्क साधून त्यांच्या अन्न व निवाऱ्याची सोय करून देण्यात आल्याचेही श्री. चं. ना. बिरार यांनी कळविले आहे.