जळगावकरांनो सावधान ! जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले 9 नवे रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यापासून काेराेनाच्या संसर्गात माेठी घसरण हाेत असताना साेमवारी त्यात धक्कादायक वाढ नाेंदविली गेली. साेमवारच्या अहवालात तब्बल ९ नवीन बाधित समाेर आले आहेत. त्यात जळगाव शहरातील गायत्रीनगरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून होत असताना जळगावकरांना सावध करणारी ही बातमी आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची रुग्ण संख्या ५ च्या आत आढळून येत होती. तर बऱ्याच वेळा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून येत नसल्याची नोंद होत होती. मात्र, काल सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ९ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यात जळगावातील एकाच कुटुंबातील चार जण बाधित आढळून आले आहे. याच कुटुंबातील एका वृद्धाचा अहवाल प्रलंबित असून, एका खासगी रुग्णालयातील कर्मचारीही कोरोनाबाधित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एरंडोल येथील तिघे तर काल मुक्ताईनगर येथील एक जण संसर्गग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या सोमवारच्या अहवालात जिल्ह्यातील नऊ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या अति धोकादायक गटातील १० तर कमी धोकादायक गटातील १२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल काल उशिरापर्यंत आले नव्हते. दरम्यान, या कुटुंबातील बालक वगळता सर्वांनी काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी 

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १७ रूग्ण सध्या विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज