fbpx

कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करावे

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंगवर भर दिला जात आहे. त्यामुळे बाधितांची संख्येत वाढू होवू शकते. लॉकडाऊनबाबत विचार सुरु असून हा निर्णय ऐनवेळी घेतला जाणार नाही. सध्या सुरु असलेल्या संशयित रुग्ण शोध मोहिमेस नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करुन शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियत्रंण मिळविण्यासाठी ग्रामीण भागात रुग्ण शोध मोहिम सुरु आहे. शहरी भागातही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोरोनाचा कामाच्या ठिकाणाहून अधिक प्रसार

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात बाधित रुग्णांच्या लक्षणांमध्ये अनेक बदल झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता डोकेदुखी, अंग दुखणे, चव न येणे, वास न येणे, डायरिया अशी लक्षणे आढळत आहे. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास नागरिकांनी स्वतःहून आपली कोरोना चाचणी करुन घेणे. केंद्रीय समितीच्या दौर्‍यातील सूचनेनुसार रुग्णशोध मोहिमेत कंटमेंट झोनमध्ये काळजीपूर्वक सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा अधिक प्रसार हा कामाच्या ठिकाणाहून होत असल्याचे निर्देशनास आले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

होळी, धुलीवंदन सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आवाहन

कोरोनाच्या काळात प्रत्येक सण, उत्सवावर बंदी असली तरी होळी आणि धुलीवंदन हा सण सार्वजनिकस्थळी न साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. तसेच याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेश देण्यात येईल. तीन दिवसाच्या लॉकडाउनबाबत विचार सुरु असून आदेशपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल. लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

दंडात्मक कारवाईवर भर – पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे
नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाची स्थिती अजून बिकट होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे विनामास्क, नियमांचे उलंघन करणार्‍यांवर अजून तीव्र स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा तीन दिवस लॉकडाऊनसाठीसुद्धा पोलीस प्रशासन सज्ज असून प्रत्येकाने मी जबाबदार या अभियानानुसार स्वयंशिस्त पाळावी, असे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले. पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयासाठी 40 बेडचे कोविड केअर सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रूग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे डॉ. बी. एन. पाटील

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यानिहाय 1 हजार नागरिकांपर्यंत रूग्ण शोध पथक पोहचत आहे. तालुक्यात अंगणवाडी सेविका, अशा वर्कर्स, शिक्षक आदी आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून माहिती गोळा करीत आहे. मोहिमेंदरम्यान आपल्याकडे येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍याला आजाराबाबत योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिली.

शहरात उद्यापासून रुग्ण शोध मोहिम- आयुक्त कुलकर्णी

शहरात कोरोनाची वाढती संख्या बघता मनपा हद्दीत मनपाच्या 10 हेल्थ सेंटर कार्यान्वित असून या माध्यमातून रुग्णशोध मोहीम शुक्रवार, 26 मार्चपासून सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करुन योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.

शहरात अनेक नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग  पाळत नसल्याचे दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसाठी मनपाची चार पथक असून सुभाष चौक परिसरासाठी स्पेशल टीम तयार करून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे.

शहरात पिंप्राळा, खोटेनगर, कांचननगर, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, शिवकॉलनी भाग हॉटस्पॉट आहे. वाढती रुग्णसंख्या बघता गृह विलगीकरणाच्या नियमात बदल केले असून परवानगीसाठी मनपाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. तर नॉन कोविडसाठी पिंप्राळा, मेहरुण आणि शिवाजीनगर येथील स्मशासनभूमीत अंत्यविधी करता येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

शहरात लवकरच कोरोना रुग्ण शोध मोहिम सुरू होणार आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असून ज्यांना लक्षणे वाटतात त्यांनी लगेच कोरोनाची चाचणी करूण घेणे आवश्यक आहे. शोध मोहिमेला आलेल्या पथकाला माहिती न लपवता योग्य माहिती देवून सहाकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज