कोरोनाबाधितांना सर्वतोपरी मदत- ना. गुलाबराव पाटील

कोविडग्रस्तांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद; प्रशासनाला दिले निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । कोविडच्या प्रतिकारासाठी अहोरात्र झटत असणारे डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांनी नाऊमेद न होता रूग्णांवर सकारात्मकतेने उपचार करा. रूग्णांशी आस्थेवाईकपणे वागून उपचार करा. आपण ही लढाई जिंकणारच असून यासाठी आम्ही आपल्याला सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव येथील तहसील कार्यालयात आयोजीत बैठकीत त्यांनी कोरोनावरील उपचारांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी थेट कोविडग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या मिळणार्‍या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथील तहसील कार्यालयात कोविडच्या उपचाराबाबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी उपलब्ध बेडस, रेमडेसिवीरसह अन्य औषधांचे नियोजन, ऑक्सीजन बेड आणि व्हेंटीलेटर्स याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, सध्याची वेळ ही आपत्तीची असून नाऊमेद होण्याची नाही. यामुळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी सकारात्मक राहून रूग्णसेवा करावी. आपण ही लढाई जिंकणारच असल्याचा आशावाद ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

धरणगाव तालुक्यात सध्या शहरासह पाळधी येथे कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. यात ३७० रूग्णांवर उपचार सुरू असून त्यात ९४ रूग्णांना ऑक्सीजन लावलेला आहे. या रूग्णांशी ना. गुलाबराव पाटील यांनी संवाद साधून त्यांना मिळणार्‍या सुविधांची माहिती जाणून घेतली. तालुक्यातील पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर तेथे आजवर सुमारे १२० रूग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे तेथे आजवर एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. याचा विशेष उल्लेख करत ना. गुलाबराव पाटील यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग पवार यांचे कौतुक केले. तर, कोविड रूग्णांशी हसतमुख व प्रेमाने वागावे असे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी लसीकरणाच्या नियोजनाबाबतही सविस्तर उहापोह केला. ते म्हणाले की,  लसीकरण करतांना कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करता कामा नये. धरणगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व १५ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. लवकरच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने मोठी गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.

दरम्यान, या बैठकीनंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. दरम्यान, काही लसीकरण केंद्राच्या ठिकाणीच कोरोनाच्या रॅपीड अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. येत्या काळात लसीकरण आणि चाचण्या दोन्ही व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्ग 15 महिलांना धनादेश वाटप !

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  धरणगाव तालुक्यातील 15 महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत 3 लाखाचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. सदर अर्थ सहाय्य मधून  शक्यतो मुलांच्या शैक्षणिक कामी खर्च करण्याचे नम्र आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी  केले. ते धरणगाव येथिल तहसील कार्यालयात धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या  १८ ते ५९  वर्षे वयोगटातील कमावत्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी  २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश* दिला जातो. या अंतर्गत धरणगाव  तालुक्यातील 15 महिलांना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एकूण 3 लाखाचे प्रस्ताव मंजूर असून सदर धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या  हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार एन आर देवरे यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विषद केली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पी.आय. जयपाल हिरे, गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बन्सी, सा.बा.चे उप अभियंता मुकेश ठाकूर , नायब तहसिलदार सातपुते, प्रथमेश मोहळ, वनराज पाटील, डॉ. पराग पवार यांच्या सह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज