fbpx

कोरोनाची वक्रदृष्टी : एकाच कुटुंबातील पाच जण दगावले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । सावद्यातील शिवाजी चौकातील रहिवासी परदेशी कुटुंबावर काळाने घाला घातला. कोरोनामुळे नुकत्याच चार जणांच्या मृत्यूच्या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच बुधवारी (ता. ३१) रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबातील राजूसिंग परदेशी  यांनी जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सात दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जण दगावल्याने संपूर्ण शहर स्तब्ध झाले.

येथील शिवसेना पदाधिकारी कै.सतीशसिंह परदेशी यांच्या स्नुषा संगीता किशोरसिंह परदेशी यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याच दिवशी सायंकाळी त्यांची सासूबाई कुवरबाई गणपतसिंह परदेशी (वय ८५) यांचा धक्क्याने मृत्यू झाला. यानंतर २५ मार्चला किशोर गणपतसिंह परदेशी (वय ५२) यांचा जळगाव रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हे कमी म्हणून की काय, याच दिवशी परदेशी कुटुंबातील पत्रकार कैलाससिंह गणपतसिंह परदेशी (वय ५५) यांचा मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावांचे निधन झाले. चार दिवसांत एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हळहळले. हे दुख:चे सावट कायम असताना ३१ मार्चला रात्री ११.३० वाजेच्या सुमारास परदेशी यांचे बंधू रामसिंह (राजू परदेशी) (वय ५९) यांचा जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परदेशी कुटुंबाने सात दिवसात ५ जणांना गमावले. यामुळे शिवाजी चौकातील एकही चूल पेटली नाही. 

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इच्छा असूनही कुटुंबातील सदस्य जिवाच्या माणसाचे अखेरच्या क्षणीदेखील अंतिम दर्शन घेऊ शकत नाही, तर अनेक नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी मृत कुटुबांच्या दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. अशी वित्रित्र व तितकीच केविलवाणी, दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे समाजात दिसत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज