⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खबरदार…! अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास कराल ; अन्यथा होणार १० हजारापर्यंतचा दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने दिनांक 21 एप्रिल, 2021 रोजी जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केला जात नाही. 

नियमावलीत नमूद कारणांशिवाय व नियमावलीत नमूद नियमांचे पालन न करता केलेला प्रवास हा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिल, 2021 रोजी रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे असून ती 1 मे 2021 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी/पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.