जिल्ह्यात आक्सिजनची आणिबाणी ; दरही दुप्पट ते तिप्पट पटीने वाढले

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जळगाव दररोज एक हजारापेक्षा अधिक नवे  कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या आरोग्यसुविधा तसेच औषधांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात सुमारे दिड हजार अॅक्टीव्ह रुग्ण आक्सिजनवर आहेत. तर, ८०० रुग्ण व्हेंटीलेटवर आहेत. त्यांच्यासाठी आक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. मागणीत वाढ होऊनही आक्सिजनचा आवश्यक तो पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात आक्सिजनची आणिबाणी झाली आहे.

जिल्ह्यात रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यात दीड हजारांवर रुग्ण हे ऑक्सिजन यंत्रणेवर आहेत तर, आठशेपेक्षा अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. या रुग्णांसाठी दररोज जिल्ह्यात किमान ४० टनापेक्षा लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन गॅस साठवणूक करण्यासाठीची क्षमता ५० टनांची आहे. 

मात्र, जळगाव जिल्ह्यासाठी दररोज केवळ ३० ते ३२ टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे, ८ ते १० टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मागणी वाढल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचे दरही दुप्पट ते तिप्पट पटीने वाढले आहेत. सध्या एका जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा दर ५०० ते ६०० रुपये आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गाचा वेग मंदावलेला असताना हेच दर २०० ते २५० रुपये होते.

ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून लिक्विड ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनचेही दर वाढले आहेत. पूर्वी लिक्विड ऑक्सिजन १२ ते १५ रुपये प्रतिकिलोने मिळत होता. आता हेच दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. सध्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. केवळ आरोग्य यंत्रणेसाठीच ऑक्सिजन पुरवठा होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज