मू.जे.महाविद्यालयात ‘संवाद कौशल्य’ कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । उत्तम प्रकारे संवाद साधता येणे हे प्रत्येकाला त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक असलेले कौशल्य आहे. सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार पूर्ण करतांना आपल्याला संवादाची आवश्यकता भासते. किंबहुना संवाद साधल्याशिवाय आपला कार्यभागच साधला जाऊ शकत नाही असे मत डॉ. गणपत ढेंबरे यांनी व्यक्त केले.

मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय ‘संवाद कौशल्य’ कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यशाळेत त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचे तंत्र सोदाहरण समजावून सांगितले. उत्तम प्रकारे बोलता येण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी लागते. अनेक प्रकारच्या पुस्तकांचे वाचन, उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे, बोलण्याचा सराव या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रामध्ये ‘दृकश्राव्य माध्यमांतील संवाद’ या विषयावर मोरेश्वर सोनार यांनी मार्गदर्शन केले. आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांमध्ये संवाद कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यासाठी आपल्याला भाषेचे उत्तम ज्ञान असले पाहिजे. शब्दांचा आरोह-अवरोह, हजरजबाबीपणा, श्रोत्यांची आकलन क्षमता, माध्यमांचे स्वरूप या सर्व बाबी आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. आकाशवाणीवर विविध श्रोतृवर्गासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचे निवेदन कसे करावे लागते याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.यावेळी त्यांनी संवादाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

या कार्यशाळेचे उद्घाटन मू.जे महाविद्यालयातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना त्यांनी संवाद साधणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. परंतु त्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. जगातील अनेक चांगल्या व्यक्तींनी आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर आपली वेगळी ओळख आणि चाहतावर्ग निर्माण केला होता त्याचे दाखले त्यांनी यावेळी दिले.

या कार्यशाळेमध्ये मूळजी जेठा महाविद्यालयातील ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभागातील प्रा. गोपीचंद धनगर यांनी मानले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -