आ.किशोर पाटलांच्या प्रयत्नांना यश ; पाचोरा-भडगाव तालुक्यासाठी लवकरच ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । पाचोरा – भडगाव तालुक्यात कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रभाव वाढतच असून वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक रुग्णांना ऑक्सीजन अभावी जीवनास मुकावे लागत आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजनचा तुटवडा पाहता पाचोरा मतदार संघात ऑक्सिजनची निर्मिती होऊन दोन्ही तालुक्यातील रुग्णांना त्याचा फायदा होण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी तातडीने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधून पाचोरा – भडगाव तालुक्यातील ऑक्सीजन प्लांट निर्मिती बाबत त्यांचा होकार मिळविला आहे. 

यात पाचोरा तालुक्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालय जवळील रुग्णवाहिणीच्या शेडमध्ये तर भडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील रिकाम्या जागेत येत्या १५ दिवसात ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार असल्याने दोन्ही तालुक्यांसाठी होत असलेल्या ऑक्सीजन निर्मितीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

पाचोरा तालुक्यासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. पैशां अभावी खासगी दवाखान्यात इलाज घेता येत नसल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. याशिवाय वाढती रुग्ण संख्या पाहता पाचोरा ग्रामीण रुग्णालय व भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला असतांना आमदार किशोर पाटील यांनी तातडीने पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालया लगत २४ तासात ७८ सिलेंडरची निर्मिती करणारा व भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत ७८ सिलेंडरची निर्मिती करणारा प्लांट सुरू करण्याची योजना हाती घेतली आहे.

यासाठी लागणाऱ्या दोन्ही प्लान्टसाठी आमदार किशोर पाटील यांच्या आमदार फंडातून १ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. शनिवारी दुपारी आमदार किशोर पाटील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित साळुंखे , स्वीय सहायक राजेश पाटील यांनी पाहणी केली. दोन्ही तालुक्यातील या प्लान्टमुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेऊ पाहणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगला फायदा मिळणार आहे. आदल्या दिवशीच लोहटार येथे पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांनी ६० हजार रुपये खर्च करून ६ ऑक्सीजन बेड सुरू केल्याने परिसरातील नागरिकांना ही त्याचा लाभ मिळणार आहे.