‘गांधीपुरा विकास आघाडी’ देणार सक्षम उमेदवार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । आगामी काळात होऊ घातलेल्या एरंडोल नगरपालिका निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले असून सक्षम उमेदवारांसाठी डावपेच सुरू झाले आहेत. २ ते ३ पॅनल सर्वशक्तीने निवडणूकीसाठी सज्ज असल्याची चर्चा सुरु असतानाच आता ‘गांधीपुरा विकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली असून या सर्वसमावेशक पॅनलद्वारे सक्षम उमेदवार देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गांधीपुरा भागातील निवडणूक सोपी असल्याच्या भावनेतूनच शहरातील उमेदवार इच्छूक असल्याची चर्चा रंगू लागली असली तरी गांधीपुरा भागावरील अन्याय आता यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा शहरवासियांनी दिला आहे. त्यासाठी गांधीपुरा विकास आघाडीची स्थापना करून या सर्वसमावेशक पॅनलद्वारे सक्षम उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु आहे. पॅनलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत विचारविनीमय सुरू आहे.

एरंडोल नगरपालिका ‘क’ वर्ग नगरपालिका असली तरी अंजनी नदीमुळे शहराचे गांधीपुरा आणि एरंडोल असे दोन भाग झालेले आहेत. एरंडोल शहर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सहा नगरसेवक गांधीपुरा भागातून निवडून दिले जातात. तरी या भागावर अनेक बाबतीत अन्यायच केला जातो, असे या परिसरातील नागरीकांचे म्हणणे आहे. शहरातील उमेदवार पैशांच्या जोरावर गांधीपुरा भागातून निवडून येवून देखील नेहमी अन्यायच पदरी पडला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत गांधीपुरातीलच उमेदवार गांधीपुरा निवडणूकीत दिला जाणार आहे. उशिरा का असेना परंतू अशा प्रकारची जाणीव होणे देखील गरजेचेच होते. त्यामुळे आता आगामी निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज