दिलासा : ऐन सणासुदीच्या काळात तेलाचे दर झाले कमी

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ । वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतांना ऐन सणासुदीच्या तोंडावर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे गृहिणींना काही अंशी का होईना, दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दिवाळी सारखा सणासुदीचा काळ असल्याने प्रत्येकाला खर्च अपेक्षित आहे. दिवाळीत फरसाण व इतर साहित्य बनविण्यासाठी खाद्य तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. गेल्या काही दिवसात सोयाबीन तेलाच्या किमतीत चांगलीच वाढ झाली होती. दिवाळीच्या काळात खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होत असल्याने तेलाच्या दरातही वाढ होते; मात्र, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना तेलाच्या दरात काही अंशी का होईना घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

असे आहेत तेलाचे दर
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेलाचे दर १४० रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. दरम्यान, सोयाबीन तेलाच्या दरात घसरून होऊन १३४ रुपयांपर्यत आले आहेत. प्रति लिटर मागे ६ रुपयांनी सोयाबीन तेलाचे दर कमी झाले आहेत. शेंगदाण्याच्या दरातही घसरण झाली असून १६५ रुपये प्रति लिटरवर दर पोहोचले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज