fbpx

जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण ; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । मागील दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत वाढला आहे. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर चांगलेच हैराण झाले. मात्र, आज शनिवारी जळगाव जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून बऱ्यापैकी दिलासा मिळाला.

जिल्ह्यात येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे, त्यातच जिल्ह्यात १८ ते २० कि.मी. वेगाने उष्ण वारे वाहत असल्याने घरात थांबनेदेखील कठीण झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्री १० वाजेपर्यंतदेखील उष्णतेचा झळा कायम असल्याने, नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत. मात्र, आज जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज