fbpx

धक्कादायक : कुऱ्हाडच्या सीआयएसएफ जवानाची ओडीसा येथे आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । सीआयएसएफमध्ये ओडीसा येथे कार्यरत असलेल्या कुऱ्हाड ता.पाचोरा येथील गोपाल अरुण सूर्यवंशी वय-२९ याने चिखला येथील सीआयएसएफ मुख्यालय येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील गोपाळ हा २०१६-१७ ला सीआयएसएफमध्ये भरती झाला होता. मध्यप्रदेश येथील बडवणी येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची पहिली नेमणूक ओडीसा येथे झाली होती. तेव्हापासून गोपाल हा ओडीसा येथे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर रुजू होता. पत्नी आणि १ वर्षाच्या मुलासह गोपाल त्या ठिकाणी वास्तव्यास होता शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. गोपाळने गळफास घेतल्याचे समजते. घटना लक्षात येताच त्याच्या पत्नीने कुटुंबियांना व वरिष्ठांना कळविले.

गोपालच्या निधनाची बातमी कळताच गोपालच्या परिवारासह कुऱ्हाड परिसरातील नागरिकांना धक्काच बसला. गोपाल हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असल्याने कुऱ्हाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोपाल व त्याच्या परिवाराबद्दल थोडक्यात माहिती

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रहिवासी असलेली गोपालची आई कुटुंबासह कुऱ्हाड येथे अनेक दिवसांपासून स्थायिक झाली होती. गोपाल हा ५ वी मध्ये असतांना त्याचे पितृ छत्र हरपले. २ भाऊ व १ बहिणीला गोपालच्या आईने अतिशय बिकट पतिस्थितीतुन काबाड कष्ट करून लहानाचे मोठे केलं. गोपाल २०१६-१७ ला सैन्य दलात दाखल झाला.

पाचोरा तहसीलदारांसह मान्यवरांनी केले सांत्वन

गोपालच्या निधनाची बातमी कळताच पाचोरा तहसीलदार कैलास चावडे व कुऱ्हाड येथील तलाठी भरत परदेशी यांच्यासह जिल्हा शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, सरपंच कैलास भगत, ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक यांनी गोपालच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी गोपालचे कुटुंबीय, मामा व गावकऱ्यांसोबत चर्चा केली.

मुलाच्या वाढदिवसासाठी नुकतेच आला होता गावी

दोन वर्षांपूर्वी गोपालचे लग्न झाले होते. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. गोपालच्या निधनाने आज सद्यस्थितीत आई, भाऊ व नवतरुण पत्नी व एकवर्षाचा मुलगा असा परिवार उघड्यावर आला आहे. मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने गोपाल नुकतेच गावी आला होता. मुलाचा थाटात वाढदिवस साजरा करून १५ दिवसांपूर्वी ड्युटीवर परतला होता. गोपालच्या कुटुंबाला शासनातर्फे किंवा स्वयंसेवी संस्थामार्फत मदत करण्याची मागणी होत आहे.

उद्या किंवा शनिवारी होणार अंत्यसंस्कार

गोपालचे पार्थिव हे शवविच्छेदन करून उद्या दि.२० रोजी ओडीसा येथून निघणार आहे. उद्या सायंकाळी किंवा शनिवारी सकाळी पार्थिव कुऱ्हाड येथे पोहचेल. पार्थिव पोहचल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज