जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । अल्युमिनियमचे तार चोरी करणाऱ्या सात संशयितांच्या निंभोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जितेंद्र पवार, बंटी भिल, आकाश पाटील, लखन पाटील, समाधान गुजर, दिनेश गुजर, जितेंद्र पाटील (सर्व रा.शिंदी ता.भुसावळ) असे आरोपींचे नावे आहे. त्यांच्या ताब्यातील गाडी व तारांचे बंडल असे ४ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
रावेर तालुक्यातील खिर्डी येथून जवळच असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशनचे पोहेका विलास झांबरे हे ९ रोजी १२:३० वाजता रात्री गस्तवर असताना बलवाडी ते तांदलवाडी रोडवर असलेल्या सिंगत गावाच्या पुढे त्यांना टाटा कंपनीची ( MH19 CY 7714) क्रं. मालवाहू गाडी संशयास्पद स्थितीत रोडवर उभी असल्याचे निदर्शनास आले असता गाडी चालकास विचारपूस केली. चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय अधिकच बळावल्याने त्यांनी सपोनि गणेश धुमाळ व पोलिस नाईक, ईश्वर चव्हाण यांना कळविले. दरम्यान गाडी मध्ये ६० हजार रू किमतीचे अल्युमिनियम तारांचे बंडल आढळून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता गाडी चालक जितेंद्र शांताराम पवार यांनी सांगितले की, बंटी भिल, आकाश पाटील, लखन पाटील, समाधान गुजर, दिनेश गुजर, जितेंद्र पाटील ( सर्व रा.शिंदी ता.भुसावळ ) येथील असून अल्युमिनियमचे तार चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर चव्हाण करीत आहेत.