चिन्या जगताप मृत्यू प्रकरण : तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असतांना झालेल्या बेदम मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल १४ महिन्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन कारागृह अधीक्षक यांच्यासह पाच जणांवर नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलिस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केला होता. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मीना जगताप यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना दिले होते. शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात चिन्याचा शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे. यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता, मात्र तसे या प्रकरणात झाले नाही. पोलीस दाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने व मृत चिन्याची पत्नी मीना जगताप यांच्या फिर्यादीवरून मंगळवार दि.३० रोजी दुपारी ३.३० वाजता तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस अण्णा काकड, अरविंद पाटील व दत्ता खोत या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -