रुग्णालयात मृत्यू झाले स्वस्त, केव्हा थांबणार हे मृत्यूचे तांडव?

राज्यभरातील रुग्णालयातील मृत्यूने मन झाले सुन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । देशभर दिवाळीचा उत्साह साजरा होत असताना शनिवारी सकाळीच आलेल्या अहमदनगरच्या बातमीने मन सुन्न झाले. शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीचं १० रुग्णांना होरपळत जीव गमवावा लागला. अनेक रुग्ण गंभीर भाजले गेले आहेत. एकीकडे देशभर नवनवीन प्रकल्प उभारण्याचे मोठमोठे कार्यक्रम होत असताना दुसरीकडे रुग्णालयात साधी अग्निशमनाची सुसज्ज यंत्रणा नसल्याची खंत वाटते. आजारातून उभारी मिळून जीवदान मिळेल या आशेने रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या वाट्याला दुर्दैवी मृत्यूचं मिळत असला तरी शासनाला त्याचे सोयरसुतक नाही. जळगाव मनपा मात्र त्यात नशीबवान म्हणावी लागेल कारण जळगाव मनपाचा स्वतःचा सुसज्ज दवाखानाच नसल्याने मृत्यूचा प्रश्नच येत नाही.

गेल्या दीड वर्षांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्र त्यात अव्वल होता. जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यू दराने तर देशात रेकॉर्ड केला होता. सर्वाधिक मृत्युदर असलेला जिल्हा म्हणून जळगाव ओळखले जाऊ लागले होते. कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला. खाजगी रुग्नालयात पाण्यासारखा पैसा खर्चून देखील जीव वाचला नाही. कोरोनाच्या भीतीपोटी हवी ती खबरदारी घेऊन देखील अनेकांना कोरोनाने गाठले. जीव वाचविण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णाला उपचारार्थ दाखल केले. कोरोनात एक वेळ अशी आली होती कि मिळेल त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास रुग्ण तयार होते.

रुग्णालये बनले मृत्यूघर 

आजवर नेहमीच गोरगरिबांचा आधार ठरलेले जिल्हा शासकीय रुग्णालय कोरोना काळात अनेकांसाठी वरदान ठरले पण त्याच रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात अनेकांना बळी देखील द्यावा लागला. कोविड काळात रुग्णालयात लागलेल्या आगीची रांगच लागली होती. भांडूप ड्रिम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज हॉस्पिटलमध्ये 25 मार्चच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत ११ रुग्णांना जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. नागपूरच्या खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत ९ एप्रिलला ४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये दि.२३ एप्रिल रोजी लागलेल्या आगीत १४ जणांनी जीव गमावला. सर्वाधिक दुर्दैवी घटना म्हणजे भंडारा जिल्ह्यात घडली होती. ज्या जिवांनी अद्याप जग पहिले नाही अशा १० नवजात जीवांना आगीत जीव गमवावा लागला होता. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे १७ पैकी १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दि.९ जानेवारी २०२१ रोजी घडली होती.

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली का?

कोरोना काळात राज्यात नागपूर, भंडारा, मुंबई आदी ठिकाणी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे पुढे आल्यानंतर आता अशा घटनांसाठी रुग्णालयाच्या संचालकांना जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आगीच्या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागल्यावर शासनाला जाग आली होती आणि रुग्णालयांचे फायर ऑडिट करून सर्व सोयसुविधा आणि अग्निशमन यंत्रणा तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आजमितीला शासन दरबारी कदाचित सर्व ठीकठाक असेलही परंतु निष्पाप जीवांचे बाली जात आहे त्याला जबाबदार कोण? अहमदनगर येथे लागलेल्या आगीवरून शासनाच्या आदेशाची आणि सूचनांची खरोखर अंमलबजावणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विकास महत्वाचा की नागरिकांचे जीव

राज्यात गेल्या पंचवार्षिकला भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते आणि या पंचवार्षिकला राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाआघाडी सरकार आहे. दोन्ही सरकारने आपापल्या काळात विकासाच्या नावाखाली रस्ते, समृद्धी महामार्ग, धरणे, आरोग्य सुविधांच्या विकासाखाली मोठा निधी खर्च केला. कोरोना काळात तर राज्यभरातील रुग्णालये सुसज्ज करण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च झाले. राज्यभरात या खरेदीवर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले असून अद्यापही अनेक ठिकाणी घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील या घोटाळ्यातील हिस्सा मिळाल्याचे आरोप होत आहेत. शासनाकडून मिळालेल्या निधीतून खर्च काही चांगले काम झाले होते तर मग अग्निशमन यंत्रणा अद्यापही सक्षम का झाली नाही. आजही रुग्णालयात आग का लागत आहेत. वेळीच मदत मिळत नसल्याने रुग्णांना जीव का गमवावा लागत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.

जळगाव जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का?

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा कोरोना काळात आणि त्यापूर्वी देखील बऱ्यापैकी विकास झाला आहे. विकासाचे श्रेय घेण्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन व विद्यमान पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यात कधीकधी शाब्दिक युद्ध देखील रंगते. कोरोना काळातील खरेदीवरून घोटाळ्याचे आरोप होत असले तरी अद्यापही रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सुसज्ज असल्याचे दिसून येत नाही. मुळात जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तात्काळ अग्निशमन विभागाचा बंब पोहोचविण्यास रस्त्यावरील रहदारीचाच मोठा अडसर आहे. शनिवारी रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे दुचाकी जाण्यास देखील वाट राहत नाही त्यातच रुग्णालयाबाहेर उभ्या राहणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांमुळे अर्धा रस्ता अडविला जातो. रुग्णालयाची रचना वेडीवाकडी असल्याने जुन्या अतिदक्षता विभागात पाण्याचा पाईप पोहोचविण्यास मोठा अडसर आहे. जिल्हा प्रशासनाने एखाद्या दिवशी मॉकड्रिल घेतल्यास राहिलेल्या उणीव लागलीच लक्षात येतील. जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच आणि मोठी महापालिका असलेल्या जळगाव शहर मनपाचे तर सर्वच आलबेल आहे. जळगाव मनपाकडे अनेक मोक्याच्या जागा असून त्याठिकाणी मनपा मालकीचे स्वतःचे रुग्णालयच नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दोन प्रमुख जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. जुने टी.बी.सॅनेटोरियमची जागा खंडार बनून भकास झाली आहे. मूळ मुद्दा असा आहे कि जळगाव मनपाला एखाद्या सामाजिक संस्था किंवा कंपनीने रुग्णालय उभारून दिल्यास त्याठिकाणी भरावयाचा स्टाफ देखील मनपाला शासनाकडून मंजूर करून घ्यावा लागणार आहे. तूर्तास खर्चाचा ताळमेळ तपासला असता शासकीय नियमानुसार आजही आस्थापना खर्च अधिकच आहे. नव्याने आकृतिबंध तयार करून त्याला शासनाने मंजुरी दिली तरच पुढील विकास होऊ शकतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज