जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२४ । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजुर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2024 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एम. व्हट्टे यांनी केले आहे.
रब्बी हंगाम 15 ऑक्टोंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या या कालावधी करीता 15 ऑक्टोंबर पासुन सुरु होणारा रब्बी हंगाम २०२४ मध्ये भुसार, अन्नधान्य, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.
पाणी अर्ज स्विकारण्याच्या काही अटी व शर्ती देखील आहेत ज्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येणार आहे. बागायतदारांना आपापल्या शेतचार्या स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवाव्या लागणार आहेत. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जांचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरी किंवा ना मंजुरीचा विचार करण्यात येणार आहे.
मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/भुसार/चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेण्यास मनाई आहे. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जाणार आहेत. सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2024 पर्यंत सादर कराण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.