वहनोत्सव : जळगाव शहरात आज मारुतीरायाचे वहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । जळगावनगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानाच्या वाहनोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी गरुडराजच्या वहनाची मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह आरती व पानसुपारीचा कार्यक्रम झाला. दरम्यान, रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी श्री मारुतीरायाचे वहनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

जयवीर हनुमान यांच्यात बळ, शक्ती, सामर्थ्य व बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम आहे. गावातील पारावर विराजमान होऊन सर्वांनी शक्तिशाली बना असा संदेश श्री. मारुतीराया देतात. सदैव रामसेवेत लीन राहणारे रामभक्त हनुमानांना रामदूत, सेवक ही उपाधी शोभून दिसते. श्री मारुतीराय यांनी भक्ती, शक्ती, युक्ती, बुद्धी व सेवेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यामुळेच श्री हनुमान हे सर्व भक्तांसाठी भूषण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ‘शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता’ सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव श्री हनुमान आहेत. त्यांनी लंकादहन, सीता शोध, हृदयात राम दाखवणारे हनुमान, लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत आणणारे हनुमान आज रविवार दि.१४ रोजी नगर प्रदक्षिणेच्या माध्यमातून जळगावकरांच्या भेटीला येत आहेत.

पानसुपारीचा कार्यक्रम
रविवारी सायंकाळी ७ वाजता गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीराम मंदिर संस्थानात वहन पूजनासह आरती होईल. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरातून निघून भोईटे गढी, कोल्हेवाडा, आंबेडकरनगर, चौधरीवाडा, विठ्ठलपेठ, विठ्ठल मंदिर, बदाम गल्ली, पांजरपोळ चौक, मारुतीपेठ, हिंगलाज माता मंदिर, रथ चौक, बालाजी पेठमार्गे वाल्मीकनगरातील श्री हनुमान मंदिर येथे पानसुपारीचा कार्यक्रम होईल. कांचननगरातील शांताराम मराठे यांच्याकडे आरती व पानसुपारीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर बालाजी मंदिर चौकमार्गे वहन श्रीराम मंदिरात येईल. श्रीराम मंदिरात राम भक्तांना गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीफळाचा प्रसाद देण्यात येईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज