नकली पोलिसाची कमाल, पोलीस ठाण्यात हजेरीच्या बहाण्याने विक्रेत्याची दुचाकी चोरली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीच्या पद्धतीत चोरट्यांनी सध्या नवनवीन शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी लंपास केल्याचा प्रकार ताजा असताना शनिवारी चक्क एकाने पोलीस असल्याची बतावणी करून फर्निचर विक्रेत्याची दुचाकीच लांबविल्याचे समोर आले आहे. अग्रवाल चौकात हा प्रकार घडला असून याप्रकरणी रविवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वाजानगर येथील शेख आसिफ शेख मुनाफ (वय ३२) हे अग्रवाल चौकात फर्निचर विक्रीचा व्यवसाय करतात. ४ डिसेंबर रोजी शेख आसिफ हे नेहमीप्रमाणे अग्रवाल चौकात असताना एक अनोळखी इसम आला. त्याने शेख आसिफ यांना नगर जिल्ह्यात गुप्त पोलिस असल्याचे सांगत नगर येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तपासासाठी जळगावात आल्याची बतावणी केली. पाेलिस असल्याबाबतचे बनावट आयकार्डही त्याने दाखवले. त्यानंतर तो याच ठिकाणी एका सोफा सेटवर झोपला.

काही वेळानंतर तो उठल्यावर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगत शेख आसिफ यांना त्यांची दुचाकी मागितली. शेख आसिफ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यास त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ए.वाय.८२३२ दिली. दुचाकी घेऊन गेल्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. शेख आसिफ यांनी भाऊ शेख युसूफ व इतरांसोबत शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवारी शेख आसिफ यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -