ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या जाळ्यात, महिलेला ५ दिवस कोठडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मध्यप्रदेशातील असल्याने त्याच्या अटकेसाठी देखील पथक पाठविण्यात आले  होते. एलसीबीच्या पथकाने मुख्य म्होरक्याला रात्री उशिरा अटक केली असून सलीम खान शेर बहादूर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या महिलेला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जळगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्‍हाणपुर) हिला अटक केली होती. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते.

महिलेला ताब्यात घेतल्यानंतर एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले होते. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात आला असून तो माल कुठे जाणार होता आणि कुणाकडून आणला होता याची माहिती मिळणार आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्‍याने केली.

दरम्यान, रविवारी अटक केलेली संशयित महिला अख्तरी बानो अब्दुल रऊफ (वय-४५, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) हिला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोलारे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. यावेळी तपासाधिकारी सपोनि शीतलकुमार नाईक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -