विरोधी उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव आणला : आ. गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । ते स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजतात आणि जिल्हा बँकेत संचालकपदासाठी आपल्या विरोधी उभे असलेल्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव आणतात. त्यांचा अर्ज रद्द करण्यासाठी बुडलेल्या पतसंस्थेचे कर्ज असल्याचा खोटा दाखला त्यांनी आणला, असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला.

मंगळवार दि.२६ रोजी शहरातील जी.एम. फाउंडेशन कार्यालयात भाजपतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. महाजन म्हणाले की, भाजपच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ आदींचे अर्जही बाद केले. काही जणांचे अर्ज त्यांनी रातोरात बदलले आहेत. केवळ उमेदवार बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने हा पळपुटेपणा केल्‍याचा आरोपही त्यांनी केला.

तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा
ते छातीठोकपणे म्‍हणत होते, की आमचा काय गुन्‍हा? आरोपात काहीही तथ्‍य नाही. असे असेल व तुम्ही काही केलेले नाही तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. ईडी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, त्यात काही तथ्य नसेल तर ईडी तुम्हाला वाजत गाजत परत पाठवेल, असा टोला आ. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना लगावला.

१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम दिलेली नाही. याविरोधात १ नोव्हेंबर रोजी भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज