जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ बॉम्ब नंतर चर्चेत आलेल्या तेजस मोरेविरुद्ध सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह हा तेजस मोरे यानेच पुरवला, असा आरोप चव्हाणांनी केला आहे.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करीत सव्वाशे तासांचे सीसीटीव्ही फुटेज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केले होते. प्रवीण चव्हाण यांनी याबाबत खुलासा करीत जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेने दिलेल्या घड्याळद्वारे ते स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप नुकताच केला होता. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावे पुढे येणार आहेत. तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षांकडे होते. मग ते गप्प का होते, असा सवाल प्रवीण चव्हाण यांनी एका टीव्ही 9 शी बोलताना उपस्थित केला आहे.
प्रवीण चव्हाण म्हणाले कि, व्हिडिओ एडिट करण्यासाठी त्यांना वेळ हवा होता. त्याचबरोबर चौकशीनंतर सर्व गोष्टी पुढे येतील, थोडा वेळ द्या. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री किंवा सरकारकडून माझ्याशी काही बोलणे झालेले नाही. या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एक कॉन्स्टेबलही सहभागी आहे. लवकरच त्यांची नावे समोर येतील, असा दावाही चव्हाण यांनी केला होता. माझा सरकारशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसल्याचेही चव्हाण म्हणाले.