कोथळी येथील घरफोडीप्रकरणी दोघांना जळगावातून अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील नंदुरबारकर सराफ हे दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी मोनुसिंग बावरी याला अटक केल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथे घरफोडी केल्याचे उघड झाले होते. दरम्यान, याप्रकरणी त्याच्या दोघं साथीदारांना पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले असून त्यांना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातील नंदुरबारकर सराफ या दुकानाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील सतवास येथून एका चोरट्यास ताब्यात घेतले होते. त्याने मोनुसिंग बावरी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (रा. शिकलकरवाडा, तांबापुरा) याला शनिवार दि.६ रोजी मेहून (ता.मुक्ताईनगर) येथून अटक केली.

मेहरूण तलाव परिसरातून केली अटक
मोनुसिंग बावरी हा मुक्ताईनगर येथे मिळून आल्याने त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कोथळी येथे घरफोडी केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी सोमवार दि.८ रोजी सापळा रचून मोनुसिंग बावरी याचा भाऊ मोहनसिंग जगदीशसिंग बावरी व सातवीरसिंग बतमतसिंग टाक (दोन्ही रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) यांना मेहरूण तलाव परिसरातून अटक केली. दरम्यान, दोघा चोरट्यांना पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या तिनही चोरट्यांनी शुक्रवार दि.५ रोजी विनोद धोंडू शिंदे (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांच्या घरात चोरी करून ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील, पोलीस नाईक इम्रान सय्यद, सुधीर सावळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, गोविंदा पाटील, सचिन पाटील आदींच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज