यावलमधील बोकाळली अवैध सावकारी, तरुणावर दोन गुन्हे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । यावल शहरातील सुमित युवराज घारू (वय २१) हा तरुण अवैधपणे गावठी पिस्तूल बाळगल्याने अटकेत होता. या गुन्ह्याच्या तपासातून अवैध सावकाराचे प्रकरण समोर आले. त्यात तालुक्यातील दहिगाव येथील एकाने सुमित विरूद्ध अवैध सावकारी, खंडणी उकळली व घरातील साहित्य उचलून नेल्याची तक्रार दिली. दरम्यान, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला गुरुवारी न्यायालयाने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी सुमित युवराज घारू याच्याकडे २ जानेवारीला गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले होते. त्याच्याकडील दुचाकी देखील चोरीची निघाली होती. या गुन्ह्याला अवैध सावकाराचे कांगोरे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. दरम्यान, दहिगाव येथील गुलाब कडू मिस्तरी-रुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील मयूर विजय पाटील याने सुमीत युवराज घारु यांच्याकडून मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी दीड वर्षापूर्वी ५० हजार रूपये व्याजाने काढून दिले होते. शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतला होता. या पैशांच्या मोबदल्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार रुपये व्याजासह परत केले आहे. तरीही सुमीत घारू हा पैशांची मागणी करत होता. त्याने एके दिवशी फिर्यादीच्या घरातील एलईडी टीव्ही, मोबाइल, होमथिएटर, फ्रिज अशा वस्तू उचलून नेल्या. तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी घारू विरूद्ध अवैध सावकारी, खंडणीचा गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे. या गुन्ह्यात त्याला १५ जानेवारीनंतर अटक होईल.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -