⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात होणारा भव्य भंडारा कार्यक्रम रद्द

0

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या “श्री साईबाबा देवस्थान वनोली येथील मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असून घटस्थापनेच्या नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही या वर्षी 14 ऑक्टोबर 21 गुरुवार रोजी येत असल्याने या दिवशी महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी अजुन कोरोनाचे संकट कायम असल्याने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे.असे या मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य,आयोजक आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे.

वनोली हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामणोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी शंभू महादेवाचे पिंडीची स्थापना व2 नंदादीप श्री साई बाबांच्या हस्ते लावण्यात आले होते ते आजही तेवत (जळत) आहेत. त्यावेळेस एकवेळा दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशा साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगता 565 वर्षापासुन याठिकाणी हे नंदादीप आजही ही जळतांना दिसत आहे.

या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खऱ्या अर्थाने हिरालाल भाऊ चौधरी हे सरपंच असताना व 1995च्या युती शासना पासूनच तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन,व आमदार एकनाथराव खडसे,आमदार हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातूनच या गावाचा व परिसराचा विकास झाला अष्टमीच्या दिवशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक प्रसादासाठी या ठिकाणी येतात हे त्यावेळी या आमदारांनी प्रत्यक्ष पाहिले आहे व खऱ्या अर्थाने निधी येण्यास सुरुवात झाली आतापर्यंत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे,स्वर्गीय खासदार वाय जी महाजन सर,विद्यमान खासदार रक्षाताई खडसे,जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागला महाप्रसादासाठी व भाविकांसाठी थांबण्यासाठी आणि सभामंडपाचे काम तसेच बामणोद ते वनोली कोसगाव पाडळसा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला.

तसेच मोर नदीच्या फुलांवर नदीला पूर आल्यामुळे भाविकांना येता येत नव्हते म्हणून कोसगाव वनोली येथे नद्यांमध्ये पूल बांधण्यात आले याठिकाणी पूर्वी गावांमध्ये हे महाप्रसादासाठी खूप गर्दी व्हायची त्यामुळे गावाच्या बाहेर जो विकास झालेला आहे तो युतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने झालेला दिसतो.भोजन कक्षासाठी टेकड्यांचे सपाटीकरण,भक्तनिवास,चौफेर कंपाऊंड,संरक्षण भिंत यासाठी करोडो रुपयांचा निधी खऱ्या अर्थानं यावल कृ.ऊ.बा.स.माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला.यावर्षी गेल्या आर्थिक वर्षामध्ये हे श्री साईबाबा मंदिराच्या परिसरासाठी15लाख रुपये रक्षाताई खडसे यांनी संरक्षण भिंत व पुन्हा7लाख रुपये काँक्रिटीकरण यासाठी निधी दिला.तसेच हरिभाऊ जावळे यांनी 5 लाखाचे काँक्रिटीकरण व10 लाख रुपयांचा सभामंडप याठिकाणी दिला आहे.

तर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी पत्री शेड साठी जिल्हा नियोजन मधून अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत तशी घोषणा करणार आहेत.ग्रामपंचायत वनोली सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व साईबाबा ट्रस्टचे विश्वस्त हिरालाल चौधरी यांनी पालक मंत्री यांच्याकडे पत्री मोठ्या शेडसाठी पन्नास लाख रुपये उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालकमंत्र्यांकडे कंलेली आहे. पाळधी येथे त्यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन येथील सर्व अध्यात्मिक सामाजिक कथा व्यथा पालक मंत्र्यांसमोर सरपंच यांनी मांडलेली आहे याठिकाणी राजकारणविरहित काम चालतं सर्व गाव एकोप्याने अंगीकारतात सर्वपक्षीय कार्यकर्ते परिसरातील या ठिकाणी येतात व दानही देतात परमेश्वराच्या आराधनेने आपली मनोकामना पूर्ण होते अशी दृढ श्रद्धा आणि आख्यायिका आहे.

घटस्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करून ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी घट बसवले जातात सर्व समाजातील बहुतांश भाविक श्रद्धेने तेल,तूप उडीदाची डाळ,गहू,साखर,गुळ दान देत असतात लहान मुलांचे जावळाचा ही कार्यक्रम होतो.  घटस्थापनेपासून येथील व परिसरातील कोसगाव,दुसखेडा, पाडळसे,बामणोद,विरोदा, कासवा,कठोरा,म्हैसवाडी,रिधोरी,मांगी,करंजी या गावातील परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने सढळ हाताने मदत करतात व कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःला वाहून घेतात.अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आश्‍विन शुद्ध अष्टमी यावर्षी दि.14 ऑक्टोबर21गुरुवार रोजी येत असल्याने महापूजा करण्यात येणार आहे व covid-19 चे संकट लक्षात घेता यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी रात्री 15आक्टोबर21रोजी शुक्रवारी सकाळी देव काठी नऊ वाजता संध्याकाळी12गाड्या ओढल्या जातील.अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी वाजत गाजत भगत जुन्या साईबाबा मंदिरावर जातो तिथून आल्यानंतर पूजा झाल्यावर रात्री आठ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो तो रात्री एक ते दोन वाजे पावेतो सुरू असतो या महाप्रसादाचा मध्ये भाविकांना पोटभर प्रसाद दिला जातो त्यात पोळी खिर गंगा फळाची भाजी व उडदाचे डाळीचे वडे हे वीस ते पंचवीस हजार भाविकांसाठी पुरेल एवढा प्रसाद या ठिकाणी केला जातो.

या कार्यक्रमास भाविकांनी दर्शन शिस्तीने रांगेत covid-19 चे नियम पाळून घ्यावे आणि संस्थांतर्फे यावेळी सॅनिटायझर वगैरे याचा वापर करण्यात येणार आहे भाविकांनी महाप्रसाद या वर्षी रद्द असल्यामुळे रात्री कोणीही गर्दी करू नये या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक आणि फैजपूर पोलीस स्टेशन चा स्टॉप बंदोबस्तासाठी उपलब्ध राहणार आहेत असे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मंदिराचे ट्रस्टी हिरालाल भाऊ व्‍यंकट चौधरी व या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थ माहिती दिली आहे.

यावल न.प.च्या जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतेही दुरुस्ती व नवे काम करू नये

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । यावल नगरपरिषदे मार्फत जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतेही दुरुस्तीचे व नवीन काम करू नये अशी लेखी स्वरूपात मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे.

दि.12 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल नगरपरिषदेच्या जुन्या व नव्या साठवण तलावाची कोणतीही दुरुस्ती व नवीन कामे करू नये या विषयाला धरून भारतीय जनता पार्टीने दि.30/9/ 2021रोजी जिल्हाधिकारी जळगाव, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेते,तसेच विधान परिषद विरोधी पक्ष नेते,पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधीकडे साठवण तलावातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी लेखी तक्रार केली आहे.

भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीचा वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन योग्य ते निर्णय लागत नाही तोपर्यंत जुन्या व नवीन साठवण तलावाचे कोणत्याही प्रकारची डागडुगी, दुरुस्ती किंवा नवीन प्रकारचे कोणतेही बांधकाम अथवा भराव टाकण्याचे काम करण्यात येऊ नये.आणि तसे झाल्यास प्रशासन म्हणून आपण स्वतः मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.असे दिलेल्या निवेदनात भारतीय जनता पार्टी यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,शहराध्यक्ष निलेश गडे,स्वीकृत नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज ऊर्फ बाळू फेगडे,शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी,शहर सरचिटणीस परेश नाईक,भूषण फेगडे,सागर लोहार, यांनी आपली स्वाक्षरी करून मागणी केली आहे.

ऐन सणासुदीत सोन्याचा भाव वाढू लागला ; वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्या दरांवर होत असल्याचा दिसून येतोय. मागील काही दिवसापासून सोने चांदीचा भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसतेय. आज (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे चांदीचा भावात घसरण झाली आहे.

जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो १६० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने प्रति १० ग्रॅम १० रुपयाने महागले होते तर चांदीच्या भावात ६० रुपयाची घसरण झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढत आहे. सणासुदीत भाव कमी होतील अशी अपेक्षा असताना मात्र त्यात वाढ होत राहिली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,३०० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६३,०३० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या काही दिवसापासून सोने व चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्या दरांवर होत असल्याने स्थानिक सराफ बाजारात ही स्थिती आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली होती. सणासुदीचे दिवस असल्याने या काळात सोने दर कमी होतील असे वाटत असतानाच मात्र सोन्याचे दर वाढत आहे.

जळगाव सराफ बाजारात मागील महिन्यात २९ आणि ३० सप्टेंबरला सोन्याचा भाव ४७ हजाराखाली आला होता. २९ सप्टेंबरला प्रति १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,९३० रुपये तर ३० सप्टेंबर रोजी ४६,६५० रुपये प्रति तोळा इतका होता. परंतु त्यानंतर सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. ३० सप्टेंबर ते आज १३ ऑक्टोबर पर्यंत सोन्याच्या भावात १६५० रुपयाची वाढ झाली आहे.

दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. ३० सप्टेंबरला चांदी प्रति किलो ६० हजार रुपयाखाली आली होती. परंतु चांदीत देखील सातत्याने वाढ झाली. ३० सप्टेंबर ते आज १३ ऑक्टोबरपर्यंत चांदीच्या भावात ३२८० रुपयाची मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. तर आज सोन्याचा भाव ४८,३०० रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. सध्या सोनं ४६ ते ४८ हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ होणार असल्याचे बोललं जातेय. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो.

रब्बीत दिलासा ! केंद्राकडून फॉस्फेट-पोटॅश खतांवर २८ हजार कोटींचे अनुदान जाहीर, जाणून घ्या दर..

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । केंद्र सरकारने मंगळवारी फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर 28,655 कोटी रुपयांची निव्वळ सबसिडी जाहीर केली जेणेकरून रब्बी पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत हे मिळू शकेल. फॉस्फेट आणि पोटॅशवर 28,655 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी पी अँड के खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दर मंजूर केले आहेत. एनबीएस (न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी) चे दरही जाहीर करण्यात आले आहेत.

नवीन दर जाहीर

या अंतर्गत एन (नायट्रोजन) 18.789 रुपये, पी (फॉस्फरस) 45.323 रुपये, के (पोटॅश) 10.116 रुपये आणि एस (सल्फर) 2.374 रुपये प्रति किलो दराने अनुदान मिळेल. आम्ही तुम्हाला सांगू की रोलओव्हरची एकूण रक्कम 28,602 कोटी रुपये असेल. त्याच वेळी, 5,716 कोटी रुपयांच्या संभाव्य अतिरिक्त खर्चासह डीएपीवर सबसिडीसाठी विशेष एक-वेळचे पॅकेज दिले जाईल. एकूण आवश्यक अनुदान 35,115 कोटी रुपये असेल. सीबीईएने एनबीएस योजनेअंतर्गत गुळापासून पोटॅशचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांना फायदा होईल

यासह, शेतकरी रब्बी हंगाम 2021-22 दरम्यान अनुदानित किमतीत सर्व पी अँड के (फॉस्फेटिक आणि पोटॅसिक) खते सहज मिळवू शकतील. चालू अनुदानाची पातळी आणि डीएपी आणि तीन सर्वाधिक उपभोग एनपीके ग्रेड चालू ठेवल्याने कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल. यामुळे डि-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) वर प्रति बॅग 438 रुपयांचा लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या किमती शेतकऱ्यांना परवडतील.

स्वस्त खतासाठी सरकारी पुढाकार

जूनमध्ये देखील, सीसीईएने डीएपी आणि इतर काही नॉन-युरिया खतांच्या अनुदानात 14,775 कोटी रुपयांची वाढ केली. सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी सुमारे 79,600 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि अतिरिक्त अनुदानाच्या तरतुदीनंतर हा आकडा वाढू शकतो. सरकारने म्हटले आहे की, अतिरिक्त अनुदानासह, सर्व पी अँड के खते शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2021-22 दरम्यान किफायतशीर दरात पुरवली जातील.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर… राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार

0

मुंबई, दि. १२ : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून, लवकरच त्यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

ग्रामीण भागातील मुलींना इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता गांव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी “मानव विकास कार्यक्रम” अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेंतर्गत एस.टी. महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन २०१३-१४ पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किंमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक व वाहक यांचे वेतनवाढ व बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च इ. विचार करुन पूर्वलक्षी प्रभावाने सन २०१३-१४ पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत परिवहन मंत्री, श्री.परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एस.टी. महामंडळास एकूण रु. ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० इतका निधी मंजूर झाला. मे, २०२१ महिन्यात पहिल्या टप्यातील रु. १९७ कोटी ५८ लाख ४० हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापूर्वीच एस.टी. महामंडळाला मिळाली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख २२ हजार २०० रूपयांचा निधी एस.टी. महामंडळाला देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निधीमधून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.असेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । पाडळसरे येथून जवळच असलेल्या जैतपीर येथील ३४ वर्षीय तरुणाचा, मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रवीण धर्मा पाटील असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी प्रवीणच्या छातीत दुखत असल्याने, त्याला गावातील युवकांनी अमळनेरातील खासगी दवाखान्यात हलवले. डॉक्टरांनी तपासून हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले, तसेच तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ. जी एम पाटील यांनी शवविच्छेदन केले.

सायंकाळी गावी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनपात १७९ जणांच्या हरकतींवर झाली सुनावणी

0
jalgaon manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेल्या व हरकत घेतलेल्या प्रभाग क्र. १ मधील मालमत्ताधारकांच्या सुनावनीला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवार दि.१२ रोजी २५० नागरिकांनी हरकत नोंदविली होती. त्यापैकी १७९ नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांनी दिली.

महानगरपालिकेककडून करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनात आढळून आलेल्या वाढीव मालमत्ताधारकांना मनपा प्रशासनाकडून विविध वाढीव करांची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी बांधकामात कुठलीही वाढ केलेली नाही किंवा भाडेकरू ठेवलेला नाही तसेच त्यांच्या मालमत्तेत कुठलाही बदल केलेला नाही, मात्र महापालिकेडून वाढीव कराची नोटीस आली असेल तर अशा नागरिकांना नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसाच्या आत हरकत नोंदविता येणार आहे. दरम्यान, मंगळवार दि.१२ रोजी २५० नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यापैकी १७९ नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. उपायुक्त प्रशांत पाटील, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी, उदय पाटील, बाळासाहेब चव्हाण यांनी यांनी हरकतींवर सुनावणी घेतल्याचे प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांनी सांगितले.

नाल्यात वाहून मृत पावलेल्या इसमाच्या वारसास ४ लाखांची मदत

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । भडगाव तालुक्यातील गुढे येथे नाल्यात वाहून मृत पावलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला शासनाकडून ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. या रकमेचा धनादेश आ.किशोर पाटील यांच्या हस्ते माळी यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

गेल्या महिन्यात सततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी यांचा नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान, भीमा माळी यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांची मदत करण्यात आली. गुढे येथे आ. किशोर पाटील यांचे हस्ते भागाबाई माळी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, माजी जि.प. सदस्य विकास पंडीत पाटील, जि.प. सदस्य संजय पाटील, शिवसेना तालूका प्रमुख डॉ. विलास पाटील, सरपंच प्रकाश पाटील, किसन माळी, कैलास माळी, भगवान महाजन, सखाराम माळी, तुकाराम माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करावा, असे आवाहन आ.किशोर पाटील यांनी यावेळी केले.

बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय ‘टीओटी’ प्रशिक्षणाचे आयोजन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अग्रभागी कर्मचारी यांचे ‘टीओटी’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत बुधवार दि.१३ व गुरुवार दि.१४ रोजी दोन दिवसीय अग्रभागी कर्मचाऱ्यांचे ‘टीओटी’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन बुधवार दि.१३ सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील या उपस्थित राहणार आहेत.