तांदुळचा काळाबाजार : ट्रक चालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । शासकीय रेशनिंगचा ३० टन तांदूळ गोंदिया येथे काळाबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक यावल पोलिसांनी दि.२३ रोजी ताब्यात घेतला होता. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकासह तीन जणांवर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय रेशनिंगचा तांदूळ ३० टन तांदूळ चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना २३ ऑक्टोबर रोजी मिळाली होती. त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह पथकाने यावल-चोपडा रोडवर हॉटेल केसर बागजवळ तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक (एम.एच.१८, ए.सी.८४७) ला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ या ट्रकमध्ये आढळून आला. यासंदर्भात पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर त्याने हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी (रा.चोपडा) यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, निलेश राजेंद्र जैन (रा.कापडणे, ता.जि.धुळे) यांच्या कापडणे येथील गोडाऊनमधून भरून भंडारा येथील गितीका पराबोलिक इंडस्ट्रीज येथे जात असल्याचे सांगितले. दरम्यान, यावल पोलिसांनी ट्रकसह चालक केदार मुरलीधर गुरव (वय-३८, रा.आकाश गार्डन समोर, शहादारोड, शिरपुर) याला ताब्यात घेतले.

दोन महिन्यात १७० टन तांदूळ विक्री
ट्रक चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीजच्या गोडाऊनची तपासणी केली, त्याठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले. गेल्या दोन महिन्यात १७० टन तांदूळ काळाबाजारात विक्री केला असल्याची माहिती यावेळी समोर आली. सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज मुरलीधर वाणी, निलेश राजेंद्र जैन, संतोष प्रभाकर पाटील व केदार मुरलिधर गुरवया चार जणांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज