आतातरी तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने करू नये; आ. महाजन

जळगाव लाईव्ह न्युज | ८ सप्टेंबर २०२१ | मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. जामनेर तालुक्‍यात दोन दिवस चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे केळी, मका, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांवरील पत्रे उडाल्‍याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्‍तांना तात्‍काळ मदत करण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केलीय. तसेच किमान आतातरी तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने करू नये; असे महाजन यांनी आज म्‍हणाले.

जामनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी गिरीश महाजन करीत आहे. आमदार महाजन यांनी आज सकाळपासून आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. आपला संसार उघडा पडल्याचे दु:ख अनेकांनी व्यक्त केले असता आमदार महाजन यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

जामनेर तालुक्‍यातील शेतकरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्‍तांना तात्‍काळ मदत करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे. परंतु, गेल्‍या दीड वर्षात अनेक नुकसानीचे पंचनामे झाले असताना शासनाकडून अद्याप कोण्यात्‍याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. शिवाय गेल्‍या आठवड्यात चाळीसगाव तालुक्‍यात झालेल्‍या नुकसानीची मदत देखील मिळालेली नाही. यामुळे आतातरी शासनाने असे न करत तात्‍काळ मदत करण्याची मागणी महाजन यांनी केली.

मंगळवारी झालेल्‍या चक्रीवादळाचा फटका जामनेर तालुक्‍यातील दहा ते बारा गावांना बसला आहे. यातील २२५ घरांचे पत्रे उडाल्‍याची माहिती प्रांत अधिकारी यांनी दिली. घरांचे नुकसान झालेल्‍यांना मंदीरात स्‍थलांतरीत केले आहे. तर पुरात २३ गुरे वाहून गेली व तीन युवक वाहून गेले असताना दोघांना वाचविता आले असून एकाला मात्र वाचविता आले नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज