पक्षी निरीक्षण : मेहरूण तलावावर ५१ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । पक्षी सप्ताहानिमित्त निसर्गमित्र, जळगावतर्फे मंगळवार दि.९ रोजी मेहरूण तलावावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५१ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्म दिवस व पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंतीचे औचित्य साधून निसर्गमित्र जळगावतर्फे दि.५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त यावर्षी मेहरूण तलावावर पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निसर्गमित्रचे पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी उपस्थित पक्षी प्रेमी नागरिकांना पक्ष्यांची माहीती व ओळख करून दिली. पक्षी निरीक्षण दरम्यान पाणकाडी, बगळा, पाणकावळे, वारकरी, पांढर्‍या छातीचा धीवर (खंड्या), सामान्य खंड्या, कवड्या धीवर, छोटी पानडुबी, वारकरी, राखी वटवटया, कोकीळ, तांबट, कोतवाल, बुलबुल, मैना, सुभग, हळद्या, वेडाराघु, पोपट, दयाळ, सातभाई, गाय बगळा आणि हिवाळी स्थलांतर करून येणारे काळा थीरथिरा, आशियाई माशीमार, श्वेत कंठी, सामान्य तुतारी आदी पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

पक्षी निरीक्षणात डॉ.योगेश टेणी, आदित्य बारी, शार्दुल जोशी, दिपक पाटील, अनिकेत खरे, गणेश जोगी, प्रा.सुजाता देशपांडे, अजयकुमार पाटील, विशाखा बापट, परम पाटील, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश जोशी, नितीन बापट आदींनी सहभाग नोंदविला. या सर्वांचे राजेंद्र गाडगीळ यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज