जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील शिवशक्ती कॉलनी जवळील सोमनाथ नगरात सोमवारी भरदिवसा धाडसी घरफोडी होऊन खलबत्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी अनिल बहऱ्हाटे यांचे जावाई राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कर्जबाजारी झाल्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
२८ लाख ५५ हजार रुपयांची घरफोडी प्रकरणी संशयिताच्या ताब्यातून २१ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमनाथ नगरातील रहिवासी व इलेक्ट्रिशियन अनिल हरी बहऱ्हाटे हे त्यांच्या पत्नीसोबत पुतण्याच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी मिरची ग्राउंड परिसरात गेले होते. चोरट्यांनी सोमवारी दुपारी २.४५ वाजेनंतर चोरी केली होती. यात २५ तोळ्यांचे दागिने व एकूण २ लाख ८० हजारांची रोकड चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून लांबवली होती.
संशयित झांबरे याने कर्ज वाढल्याने चोरी केल्याचे सांगितले. संशयिताने यापूर्वीच अडगळीत ठेवण्यात आलेल्या खलबत्त्यातून वेळोवेळी ७ लाख ५० हजार रूपयांचे १०० ग्रॅम सोने लांबवल्याचेही कबुल केले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे दागिने आणि २ लाख ६० हजार रुपयांची रोकड असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
बऱ्हाटे यांच्याकडे झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी परिसरा सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती काढली, तसेच मेहंदी कार्यक्रमात कोण-कोण नातेवाईक आले याची माहिती जाणली. संशयित राजेंद्र झांबरे याच्या पत्नीचाही जवाब नोंदवला. त्यांनी सांगितले की, पती हे दोन ते अडीच तास कार्यक्रमाच्या ठिकाणी नव्हते.